'ठाणेवैभव'ची अनोखी संकल्पना
ठाणे: गणेशोत्सवाला सामाजिक अधिष्ठान मिळावे यासाठी 'ठाणेवैभव'ने '२१ दुर्वांची संकल्प जुडी' ही अनोखी संकल्पना राबवली असून ठाणेकरांना २१ आदर्श संकल्पांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे शहरातील गणेश मंडळांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
ठाण्यात अनेक मंडळे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. या उत्सवात लाखो गणेशभक्त सहभागी होतात. त्यामुळे लोकांमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तन करण्यासाठी हा उत्सव उपयुक्त ठरु शकतो, या जाणिवेतून 'ठाणेवैभव'ने फलकांच्या माध्यमातून ठाणेकरांना २१ दुर्वांची संकल्प जुडी वाहण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे. ठाणेवैभव'चे संपादक मिलिन्द बल्लाळ यांनी अग्रलेखाच्या माध्यमातून देखील ठाणेकरांना आवाहन केले होते. यावर वाचकांनी मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिक्रिया कळवल्या.
सार्वजनिक शिस्त राखू, वाहतूक नियम पाळू, कापडी पिशव्यांचा वापर करू, ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करू, पाण्याची नासाडी टाळू, विजेचा अपव्यय थांबवू, अनधिकृत घरखरेदी टाळू, वेळेवर कर भरू, मतदानाचा हक्क बजावू, गाडी चालवताना मोबाईल वापरणार नाही, अन्नाची नासाडी थांबवू, सार्वजनिक स्वच्छतेवर भर देऊ, सार्वजनिक ठिकाणी मोबाईलवर हळू बोलू, ज्येष्ठांची काळजी घेऊ, अतिक्रमण करणार नाही, मोकळ्या पदपथाचा आग्रह धरू, तलावांचे संवर्धन करू, वृक्षारोपण करू, मोबाईल/स्क्रीन टाईम कमी करू, वाचनाची आवड जोपासू आणि ध्वनी प्रदूषण टाळू अशा २१ संकल्पांचा उल्लेख असलेले बॅनर गणेश मंडळांनी मंडप परिसरात लावण्यास सुरुवात केली असून भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत.
या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती होईल, या संकल्परुपी दुर्वांच्या जुड्या वाहून नागरिक चांगल्या सवयी अंगी बाणवतील असा विश्वास व्यक्त होत आहे.