बॉलिवूड गाणी, डीजेच्या वापरात घट, तरीही आवाज ९५ डेसीबलवर
ठाणे: विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे आणि डॉल्बीच्या वापरात सुमारे २० टक्के घट झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले असले तरी विविध वाद्ये आणि ध्वनिक्षेपक एकाचवेळी सुरू झाल्याने दीड दिवसाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत रात्री श्री राम मारुती मार्गावर तलावपाळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तब्बल ९५ ते १०० डेसिबल ध्वनीपातळी नोंदविण्यात आली. त्याचवेळी महापालिका मुख्यालयासमोरील कचराळी तलाव परिसरात ध्वनीपातळी ७० डेसीबलपर्यंत घसरल्याचे आढळून आले.
दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर रात्री ८.३० ते ११ वाजेदरम्यान शहरातील विविध ठिकाणी ध्वनीपातळीची पाहणी करण्यात आली. राममारुती रोड येथे रात्री ८.४५ वाजता ९० डेसिबल, तर महात्मा गांधी रोडवरील नौपाडा पोलिस ठाण्याजवळ ८.५३ वाजता ९५ डेसिबल आवाजाची नोंद झाली. या परिसरात ढोल आणि बँजोचा वापर सुरू होता. राम मारुती रोड, शिवाईनगर आणि पाचपाखाडी येथे ध्वनीपातळी ९० ते ९५ डेसिबलच्या दरम्यान राहिली. अराधना टॉकीज परिसरात ८० ते ८५, वर्तकनगर पोलिस ठाणे परिसरात ८० ते ८५, तर एमआरआर हॉस्पिटलजवळ ८५ ते ९० डेसिबल आवाज नोंदविण्यात आला. ठाणे महापालिका परिसरात तुलनेने कमी म्हणजे ७० ते ७५ डेसिबल ध्वनी आढळला. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ध्वनीप्रदूषणाने उच्चांक गाठला. राम मारुती रोड येथे ९० ते ९५ डेसिबल, तर त्यानंतर पी.एन. गाडगीळ शोरूम परिसरात तब्बल ९५ ते १०० डेसिबल ध्वनीपातळी नोंदविण्यात आली. या ठिकाणी डीजेसह अनेक ढोल एकाचवेळी सुरू असल्याचे निरीक्षणात नमूद करण्यात आले आहे. तलावपाळी येथे रात्री ११.०७ वाजता ९० ते ९५ डेसिबल आवाजाची नोंद झाली असल्याची माहिती दक्ष नागरिक डॉ. महेश बेडेकर यांनी दिली.
मागील वर्षांच्या तुलनेत बॉलीवूड किंवा फिल्मी गाणी मोठ्या आवाजात वाजवण्याचे प्रमाण कमी झाल्याचे निरीक्षणात नमूद करण्यात आले आहे. डीजे आणि डॉल्बीच्या वापरातही सुमारे २० टक्के घट झाली. मात्र, ढोल-ताशे, बँजो आणि ध्वनिवर्धक हे ध्वनीप्रदूषणाचे प्रमुख स्रोत ठरले. मिरवणुका पुढे सरकत असताना अनेक वाद्ये एकत्र वाजल्याने रात्री उशिरा आवाजाची पातळी वाढल्याचे दिसून आले.
राम मारुती रोडवर ८.४५ वाजता ९० डेसीबल तसेच ९.१० आणि ११ वाजता ९०-९५ डेसीबल, महात्मा गांधी रोड नौपाडा येथे ८.५३ वाजता ९५ डेसीबल, शिवाईनगरमध्ये ९.४० वाजता ९०-९५ डेसीबल, पाचपाखाडीत १०.१० वाजता ९०-९५ डेसीबल, पी.एन. गाडगीळ शोरूम परिसरात ११.०५ वाजता ९५-१०० डेसीबल आणि मासुंदा तलावपाळी परिसरात ११.०७ वाजता ९०-९५ डेसीबल ध्वनी पातळीची नोंद झाली.