उपमहापौरांनी घेतला महापौरांच्या आसनाचा ताबा
उल्हासनगर: गेल्या दोन महिन्यांपासून महापालिकेची महासभा न झाल्याने आधीच नाराजीचे वातावरण असताना आज झालेली उल्हासनगर महापालिकेची महासभा विविध मुद्द्यांवरून चांगलीच वादळी ठरली. पाणीटंचाई, डम्पिंग ग्राउंड, विकास आराखडा, झूलेलाल मंदिर परिसरातील रस्त्यांच्या कामातील कथित घोटाळा तसेच रिजेन्सी अँटॅलिया परिसराला पर्यटनस्थळ घोषित करण्याच्या शासकीय प्रस्तावावरून शिवसेना आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
महापालिका प्रशासनाकडून रिजेन्सी अँटॅलिया येथे पर्यटनस्थळ घोषित करण्याबाबतचा शासकीय प्रस्ताव महासभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव आमदार कुमार आयलानी यांच्या पुढाकाराने आला. मात्र, या प्रस्तावाला शिवसेनेच्या नगरसेवकांनी तीव्र विरोध केला. यावेळी भाजपच्या वतीने प्रस्तावावर मतदान घेण्याची मागणी करण्यात आली.
या विषयावर चर्चा सुरू असतानाच महापौरांनी जेवणासाठी सभा तहकूब करण्याची घोषणा केली. त्यावर भाजपचे गटनेते राजेश वधारिया, नगरसेवक राजेश वानखेडे आणि शेरी लुंड यांनी आक्षेप घेतला. महापौरांनी सभा तहकूब करून सभागृह सोडणे नियमबाह्य असल्याचा दावा करत त्यांनी महापौरांचे आसन रिकामे ठेवता येत नसल्याचे सांगितले. तसेच भाजपचे उपमहापौर अमर लुंड यांनी महापौरांच्या आसनावर विराजमान व्हावे, अशी मागणी करण्यात आली.
अमर लुंड महापौरांच्या आसनावर बसताच शिवसेनेच्या नगरसेवकांनी जोरदार गोंधळ घातला. त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक सभागृहातून बाहेर पडले. त्यांच्या पाठोपाठ आयुक्तांसह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारीदेखील सभागृहाबाहेर गेले.
दरम्यान, महापौरांच्या आसनावर बसलेल्या उपमहापौर अमर लुंड यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना सभा सुरू असल्याचे सांगत उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या. मात्र, एकही अधिकारी सभागृहात न थांबता बाहेर गेले. त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी अँटॅलिया पर्यटनस्थळ प्रस्तावावर मतदान घेऊन तो एकमताने मंजूर केल्याचा दावा केला.