जिल्हा

प्रामाणिक आणि पारदर्शक व्यवहार हीच कर्तृत्वाची खूण - अश्विनी भिडे

प्रामाणिक आणि पारदर्शक व्यवहार हीच कर्तृत्वाची खूण - अश्विनी भिडे
प्रामाणिक आणि पारदर्शक व्यवहार हीच कर्तृत्वाची खूण - अश्विनी भिडे फोटो: ठाणे वैभव
ठाणे: 'आपल्या हातून घडणाऱ्या प्रत्येक कृतीमागे जबाबदारीची आणि स्वामित्वाची जाणीव असेल तर चुकीचे काम होत नसते', असे मत मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी व्यक्त केले. श्रीमती भिडे यांची मुलाखत निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी घेतली. ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात शिल्पा खेर लिखित 'यश म्हणजे काय?' या पुस्तकाच्या तिसऱ्या भागाचे प्रकाशन झाले. यावेळी पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी, पद्मश्री डॉ. शरद काळे, राज्यसभा सदस्या खा. सुमित्रा वाल्मिक, पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे, वॉर विडो असोसिएशनच्या अध्यक्षा दमयंती तांबे, महापौर शर्मिला पिंपळोलकर, आयुक्त सौरभ राव आदी मान्यवर उपस्थित होते. प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता या दोन गुणांमुळे दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडता येते. वेळेचे काटेकोर नियोजन केले तर स्वतःचा तर वेळ वाचतोच, पण त्याचबरोबर दुसऱ्यांच्या वेळेचा आदर राखला जातो. सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन होणाऱ्या टीकेवर व राहिलेल्या त्रुटींवर मात करता येते, असे आयुक्त अश्विनी भिडे म्हणाल्या. मित्र आणि पैसा यांचे जीवनात महत्व असले तरी ही नाती जपण्यासाठी आणि पैसा कमवण्याच्या पद्धतीबद्दल बारकाईने विचार करायला हवा. प्रश्न कितीही बिकट असला तरी त्याला उत्तर असतेच, त्यामुळे चिकाटीने आणि प्रामाणिक हेतू बाळगला तर काम फत्ते होतेच, असेही त्या म्हणाल्या. पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, संशोधनाच्या क्षेत्रात मुलांनी रस घ्यायला हवा आणि सरकारनेही अशा तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला हवे. मुलांनी एकाग्रतेसाठी ध्यान करायला हवे, असेही ते म्हणाले. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांनी मुलांना कठोर परिश्रम करण्याचा सल्ला दिला. यश म्हणजे तुमच्यातले सर्वोत्तम अशी व्याख्या करून ज्या दिवशी आपला सूर लागतो ते यश असते, असेही त्या म्हणाल्या. खा. सुमित्रा बाल्मिक यांनी मनाची शुद्धता आणि धार्मिक आचरण या यशाची गुरुकिल्ली असतात असे सांगितले. पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी संयम, साधेपणा आणि सातत्य या त्रिसूत्रीचे आचरण हेच यशाचे गमक असल्याचे सांगितले. शहरांमध्ये घनकचऱ्याची समस्या आहे, पण मनातल्या कचऱ्याचाही बंदोबस्त करायला हवा, असे ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी मेंदूची पिछेहाट होणार नाही असे सांगताना 'ठाणेवैभव'चे संपादक मिलिन्द बल्लाळ यांनी १९९७मध्ये ग्रॅण्ड मास्टर गॅरी कॉस्पोरोव्ह यांना आयबीएमच्या 'डीप ब्ल्यू' संगणक प्रणालीने पराभूत केल्याची आठवण करून दिली, परंतु २००३ साली ग्रॅण्ड मास्टर व्लादिमीर क्रॅमनिक आणि कॉस्पोरोव्ह यांनी बुद्धिमत्तेच्या जोरावर संगणकाबरोबर खेळताना सामने अनिर्णित ठेवल्याचेही सांगितले. २०१७ साली तर मॅग्नस कार्लसनने संगणकाला पराभूत केले होते. मानवी प्रज्ञा ही यशाची हमी देईल परंतु त्यावर विश्वास ठेवला जायला हवा, असे मत श्री.बल्लाळ यांनी व्यक्त केले. लेखिका शिल्पा खेर यांनी पुस्तकाचा आढावा घेताना केवळ यशोगाथा लिहिली नसून या मान्यवरांच्या यशाचा प्रवास, त्यातील बरे-वाईट अनुभव आणि आव्हानांचा लेखाजोखा असल्याचे सांगितले. भाग्यश्री फाउंडेशनचे जितेंद्र खेर यांनी सर्वांचे स्वागत करून त्यांच्या संस्थेच्या कार्याची माहिती दिली. ग्रंथालीचे सुदेश हिंग्लासपूरकर यांनी ग्रंथालीच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले. ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय सेवा प्रशिक्षण संस्थेचे संचालक महादेव जगताप आपल्या सुमारे शंभर विद्यार्थ्यांसह उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475