जिल्हा
आधीच वाहतूक कोंडीचा कहर; त्यात मॉल, डेटा सेंटरची भर
आधीच वाहतूक कोंडीचा कहर; त्यात मॉल, डेटा सेंटरची भर
फोटो: ठाणे वैभव
राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांची टीकेची झोड
ठाणे: ठाणे शहरातील बाळकुम येथील प्रस्तावित डेटा सेंटर, घोडबंदर रोडवरील वाढती वाहतूक कोंडी, नव्या मॉलला मंजुरी आणि अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत शहरातील विविध प्रश्नांवर पक्षाची भूमिका स्पष्ट करत प्रशासनावर टीकेची झोड उठवली.
घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी हा ठाणेकरांसाठी दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला प्रश्न असून, शहराच्या वाहतूक नियोजनातील त्रुटी यासाठी जबाबदार असल्याचा आरोप मुल्ला यांनी केला. वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेऊन शासन व प्रशासनाने तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी दीर्घकालीन आणि प्रभावी वाहतूक आराखडा राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर, ठाण्यात आधीच अनेक मोठे मॉल अस्तित्वात असताना आणखी एका नव्या फिनिक्स मॉलला मंजुरी देण्याचे औचित्य काय, असा प्रश्न उपस्थित करत शहराच्या क्षमतेचा आणि नागरिकांच्या हिताचा विचार करूनच अशा प्रकल्पांना परवानगी दिली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या आलिशान बंगल्यांच्या प्रकरणाकडेही त्यांनी लक्ष वेधले. नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत. संबंधित प्रकरणांमध्ये ठाणे महापालिकेने कोणताही दुजाभाव न करता निष्पक्ष आणि कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
शहरातील विकासकामे आणि मोठ्या प्रकल्पांबाबत पारदर्शकता, योग्य नियोजन आणि नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे नजीब मुल्ला यांनी स्पष्ट केले.
बाळकुम येथे प्रस्तावित डेटा सेंटरच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नजीब मुल्ला यांनी १ ते ३ ऑगस्टदरम्यान नागरिकांसोबत व्यापक आंदोलनाची घोषणा केली आहे. डेटा सेंटरमुळे पर्यावरण, आरोग्य, वाहतूक आणि स्थानिक पायाभूत सुविधांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत नागरिकांमध्ये गंभीर चिंता व्यक्त केली.
300x450
300x600