सुदैवाने जीवितहानी टळली
ठाणे : जांभळी नाका येथे भर बाजारात बेकायदेशीरपणे उघड्यावर सुरू असलेल्या प्रीती सँडविच दुकानात अचानक स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीत दुकान जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी टळली.
चिंतामणी ज्वेलर्सजवळ प्रिती सँडविच दुकान असून ते महावितरणच्या डीपीजवळच बेकायदेशीरपणे सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी अचानक आग लागली. त्यावेळी सिलेंडर स्फोटाचा आवाज झाल्याचे नागरिकांनी सांगितले. आग लागल्याचे लक्षात येताच दुकानातील मालक, कर्मचारी आणि ग्राहकांनी प्रसंगावधान राखत तत्काळ दुकानाबाहेर धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या चार गाड्या, आपत्ती व्यवस्थापन पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले . अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. सुरक्षेचा उपाय म्हणून संबंधित इमारतीतील रहिवाशांनाही तात्पुरते बाहेर काढण्यात आले होते.
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अग्निशमन विभागाकडून अधिक तपास सुरू आहे.