आनंदनगर-साकेत पुलाच्या कामात हिरवळीचे अस्तित्व धोक्यात
ठाणे: मुंबईच्या फ्री वे ला जोडणाऱ्या सिग्नल विरहित आनंदनगर ते साकेत उड्डाण पुलाच्या कामामुळे ठाण्याच्या हरित जनपथाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे. तीन हात नाका पट्ट्यातील जनपथावर ठिकठिकाणी खोदाई करून पिलर उभारण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या या हिरवळीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
२०१३मध्ये ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांच्या संकल्पनेतून नितीन कंपनी ते तीन हात नाका या मार्गावर हरित जनपथ विकसित करण्यात आला होता. दोन्ही बाजूंना हिरवळ आणि मधोमध पदपथ अशी रचना असलेल्या या जनपथाचा सकाळ-सायंकाळ नागरिक फेरफटक्यासाठी वापर करत होते. इकडे वाहनांची वर्दळ तर दुसरीकडे हिरवळीने सजलेला जनपथ यामुळे ठाण्यात प्रवेश करताच सुखद अनुभव येत होता. शहरातील वाढत्या काँक्रिटीकरणाच्या काळात नागरिकांना मोकळी जागा आणि हिरवळ उपलब्ध करून देणारा हा पट्टा ठाण्याच्या महत्त्वाच्या सार्वजनिक जागांपैकी एक मानला जात होता. पण आता हा हरितपट्टा उन्नत मार्गामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
एमएमआरडीएने उड्डाणपुलाचे काम सुरू केले असून सध्या तीन हात नाका ते नितीन कंपनीपर्यंत खांब उभारण्यास सुरुवात झाली आहे. मेट्रो चारला लागून सेवा रस्त्यावर उन्नत मार्ग उभारण्याचे काम सुरू आहे.
तीन हात नाक्यावरून जाणारा पूर्व द्रुतगती मार्ग आणि सेवा रस्ता यामध्ये असलेल्या हरित जनपथची किनार यामुळे बाधित होत आहे. लोखंडी पत्रे आणि हिरवा पडदा लावून सध्या जनपथाच्या अनेक भागांत खोदाई करून खांब उभारले जात आहेत. त्यामुळे जनपथावरील हिरवळ, पदपथ आणि झाडांवर त्याचा थेट परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
वास्तविक या मार्गासाठी २०२५मध्ये या हरित जनपथावर माती परीक्षण करण्यात आले होते. त्यावेळी जनपथाला बाधा पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. आता प्रत्यक्ष प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर हा धोका सत्यात उतरल्याचे दिसून येत आहे.
वाहतूक सुविधा निर्माण करताना शहरातील आधीच उपलब्ध असलेली हिरवळ किती प्रमाणात गमवावी लागणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. उन्नत मार्ग उभारणे गरजेचे असले, तरी त्यासाठी बाधित होणाऱ्या जनपथाचे आणि वृक्षांचे नेमके काय नियोजन करण्यात आले आहे, याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. विशेषतः किती झाडे बाधित होणार, किती झाडांचे पुनर्रोपण होणार आणि जनपथाची पर्यायी हिरवळ कुठे विकसित केली जाणार, याकडे ठाणेकरांसह पर्यावरण प्रेमींचे लक्ष लागले आहे.