भाईंदर : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मौजे पेणकरपाडा येथील गृहप्रकल्पातील १९६ विजेत्यांना अखेर दिलासा मिळाला. मध्यम उत्पन्न गटातील सदनिकाधारकांच्या भुईभाड्यात मोठी कपात करण्यात आली असून, दरमहा २६५७ रुपये असलेले भुईभाडे आता २९८ रुपये करण्यात आले आहे. नवे दर १ ऑक्टोबरपासून लागू करण्यात आले आहेत.
कोकण मंडळाकडून मीरा रोड येथील मौजे पेणकरपाडा येथील १९६ घरांसह दोन सुविधा घरांसाठी २०२१ मध्ये सोडत काढण्यात आली होती. या घरांचा समावेश मध्यम उत्पन्न गटात होता. या घरांचा समावेश असलेल्या इमारतींना डिसेंबर २०२३ मध्ये भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले. त्यानंतर सदनिकांच्या ताबा प्रक्रियेस कोकण मंडळाकडून सुरुवात करण्यात आली. म्हाडा प्राधिकरण ठराव क्रमांक ३०९४ नुसार प्रकल्पातील विविध कामांसाठी, जमीन आणि जमिनीच्या विकासासाठी लागणारा अपेक्षित खर्च विचारात घेऊन पहिल्या एका वर्षासाठी प्रति सदनिका दरमहा २,६५७ रुपये भुईभाडे निश्चित करण्यात आले होते. ते कमी करण्याची मागणी सदनिकाधारकांनी कोकण मंडळाकडे केली होती. यासंबंधीचे निवेदनही कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. विशाल राठोड यांना देण्यात आले होते.
सदनिकाधारकांच्या मागणीचा विचार करून प्राधिकरण ठराव क्रमांक ६९९५ नुसार भुईभाड्याचा सुधारित दर निश्चित करण्यात आला. त्यानुसार दरमहा २६५७ रुपये असलेल्या भुईभाड्यात २३५९ रुपयांची कपात करून ते आता २९८ रुपये करण्यात आले. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी यासंबंधीच्या ठरावास मान्यता दिल्यानंतर १ ऑक्टोबरपासून सुधारित भुईभाडे दर लागू करण्यात आल्याची माहिती कोकण मंडळाकडून देण्यात आली.