ठाणे : शाळा इमारत, जागांचे हस्तांतरण, शिक्षकांची रिक्त पदे व अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे निर्माण होणारे शैक्षणिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी गुरुवारी दिले.
‘चला शाळेत जाऊ या’ अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यातील शिक्षणव्यवस्थेचा आढावा घेताना शाळांच्या प्रत्यक्ष भेटीतून समोर आलेल्या अडचणी सोडविण्याबरोबरच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला. विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन त्यांचे आरोग्यविषयक कार्ड तयार करण्यासह शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील शाळांची स्थिती, शिक्षकांची उपलब्धता, शाळांच्या जागा व इमारतींचे प्रश्न, दुरुस्तीसाठी आवश्यक निधी व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तालुका व महानगरपालिका क्षेत्रांत एकूण ४,७८९ शाळा असून, त्यात १७ लाख १५ हजार १२८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी ५० हजार २७७ शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हा परिषद क्षेत्रातील २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील १,३२५ प्राथमिक शाळांमध्ये ६६ हजार ४०८ विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांच्यासाठी ३,१६६ शिक्षक कार्यरत असल्याची माहिती बैठकीत सादर करण्यात आली.
कल्याण-डोंबिवलीतील २७ गावे व अंबरनाथ परिसरातील जिल्हा परिषद शाळांच्या जागा व इमारतींचे महानगरपालिकांकडे हस्तांतरण हा महत्त्वाचा विषय बैठकीत चर्चेला आला. वन विभागाच्या जमिनीवरील शाळांच्या दुरुस्तीसाठी येणाऱ्या अडचणी, तसेच बदलापूर परिसरातील खासगी जागांवर असलेल्या शाळांचे प्रश्नही मांडण्यात आले.