मुंबई: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यांवरील फटाक्यांचा कडकडाट यंदा शमण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने राज्यभर सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यांवर आतषबाजी करण्यास बंदी घातली आहे.
सणांच्या दिवसात मुंबई-पुण्यासारखी शहरे उत्सवकाळात जगण्या आणि राहण्यायोग्य राखण्यासाठी यंदाच्या दिवाळीत सार्वजनिक ठिकाणे आणि रस्त्यांवर फटाके वाजवण्यास बंदी आवश्यक असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवारी सांगितले. त्याबाबतची नियमावली आठवड्याभरात नियमावली प्रसिद्ध करून त्याची कठोर अंमलबजावणी सुरू करण्याचे आणि ही नियमावली कायमस्वरूपी असल्याचेही आदेशही न्यायालयाने दिले. याबाबत व्यापक जनजागृतीसाठी सेलिब्रिटींची मदत घेण्याची सूचनाही न्यायालयाने दिली.
गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर ढोल-ताशे, डीजे, टोलवाद्य आणि अन्य कर्णकर्कश्श वाद्यांमुळे होणारे ध्वनीप्रदूषण तसेच दिवाळीत होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे होणाऱ्या हवा प्रदूषणाची न्यायालयाने दखल घेतली होती. त्याचप्रमाणे याप्रकरणी स्वत: हून जनहित याचिका दाखल करून घेतली होती व कर्णकर्कश वाद्ये वाजवण्यावर बंदी घालण्यासह सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यांवर फटाके वाजवण्यासही बंदी घालण्यात आली होती. या याचिकेत ‘दी असोसिएशन ऑफ फायरवर्क्स ट्रेडर्स’ने एक अर्ज करून २२ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशाबाबत नेमके स्पष्टीकरण देण्याची विनंती केली. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी, २२ सप्टेंबर रोजी दिलेला आदेश हा वर्षभरात साजऱ्या होणाऱ्या सर्व सण-उत्सवांसाठी लागू असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, त्या आदेशाबाबत अधिक स्पष्टीकरण देणारा सविस्तर आणि कारणमीमांसा करणारा आदेश गुरुवारी रात्रीपर्यंत उपलब्ध करून देण्यात येईल, असेही स्पष्ट केले. उच्च न्यायालयाचे आदेश
सार्वजनिक ठिकाणे आणि रस्त्यांवर फटाके वाजवण्यावरील बंदी ही वर्षभरासाठी आणि सर्व उत्सवांसाठी लागू असेल.