ठाणे: काही दिवसांवर दिवाळी सणाची लगबग सर्वत्र सुरु होणार असतानाच ठाणे जिल्ह्याला उद्यापासून पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. अल नीनोच्या धर्तीवर पाण्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हे पाऊल उचलले असले तरीही मिळालेल्या माहितीनुसार बारवी धरणात ९८.८३ टक्के, तर भातसा धरणात ९६.५३ टक्के पाणीसाठा आजच्या घडीला उपलब्ध आहे. त्यामुळे भरलेली धरणे उराशी असतानाही जिल्हावासीयांच्या घशाला ३०टक्के पाणी गळतीमुळे उद्यापासूनच कोरड लागण्यास सुरुवात होणार आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अंबरनाथ विभागाने जाहीर केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ, बदलापूर औद्योगिक क्षेत्र, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगरपरिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच परिसरातील अन्य ग्रामपंचायती आणि नागरी वस्त्यांचा पाणीपुरवठा गुरुवार, १६ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवार, १७ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे. ठाणे महापालिकेला ही कपातीचा सूचना देण्यात आल्या आहेत.
एमआयडीसीच्या सूचनेनुसार, पुढे २२ ऑक्टोबरपासून प्रत्येक गुरुवारी रात्री १२ ते शनिवारी दुपारी १२ या ३६ तासांच्या कालावधीत पाणीपुरवठ्यात कपात करण्यात येणार आहे. उपलब्ध जलसाठ्याचे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पण ठाणे जिल्ह्याला खरंच अशा कपातीची गरज आहे का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
पावसाळा संपल्यानंतर धरणांतील साठा हा उन्हाळ्यापर्यंतचा आधार असतो. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या धरणांच्या स्थितीनुसार बारवी धरणात ९८ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. तर भातसा धरणामध्ये 96 टक्के पाणीसाठा आहे. मात्र, पुढील पावसाचे आगमन लांबल्यास हाच साठा शहरांची तहान भागविण्यासाठी जपून वापरावा लागेल. त्यामुळे पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत जलसाठ्याचे नियोजन करण्यावर शासनाने भर दिला जात असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाने दिले आहे . ठामपा मध्ये ३०टक्के पाणी गळती आणि पाणीचोरी होत आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी पाणीचोरी आणि पाणी गळती रोखण्याची सूचना प्रशासनाला केली होती. ठाणे महापालिका हद्दीत मागिल दीड महिन्यात २६, ठिकाणी जलवाहिनी लिकेज तर दोन वेळा जलवाहिनी फुटण्याची घटना घडली होती. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने शेकडो अनधिकृत जलवाहिनी तोडून अनेकांच्या विरोधात गुन्हा देखिल दखल केला होता तसेच पाण्याचे पंप देखिल जप्त करण्यात आले होते. या सर्व पाणी गळतीवर महापालिकेने नियंत्रण आणल्यास पाणी कपात करण्याची गरज लागणार नाही असे एका महापालिकेच्या वरिष्ठ नगरसेवकाने सांगितले.
धरणांचा उपयुक्त पाणीसाठा (दलघमी आणि टक्केवारी )
बारवी: ३३४.८६० (९८.८३टक्के), भातसा: ९०९.४५० (९६.५३टक्के), आंध्रा
३२६.८९० (९२.७०टक्के), तानसा: १३१.१०४ (९०.३७टक्के), मोडकसागर: ८०.०३२ (६२.०८टक्के)