महापालिका प्रशासनावर सरनाईकांची नाराजी!
भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या सौरनियंत्रित विंड्रो कंपोस्टिंग प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘स्कॉच रौप्य पुरस्कार’ मिळाला आहे. मात्र, या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यासह त्याच्या उभारणीसाठी पाठपुरावा केल्याचा दावा करणारे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या योगदानाचा पुरस्कार स्वीकारताना उल्लेख न झाल्याने त्यांनी महापालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.
मीरा रोड पूर्वेतील हटकेश तसेच भाईंदर पूर्वेतील सचिन तेंडुलकर मैदान येथे दररोज २० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेले विंड्रो कंपोस्टिंग प्रकल्प उभारण्यात आले आहेत. शहरातील कचरा व्यवस्थापनाला चालना देणाऱ्या या प्रकल्पाच्या उल्लेखनीय कामगिरीची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत महापालिकेला स्कॉच रौप्य पुरस्काराने गौरविण्यात आले.
नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील आणि उपायुक्त सचिन बांगर यांनी पुरस्कार स्वीकारला. मात्र, पुरस्कार स्वीकारताना या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पाठपुरावा करण्यासाठी आपण केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख झाला नसल्याने मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली.
शहरातील कचरा व खत व्यवस्थापनासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणण्यासाठी आपण प्रयत्न केले, असा दावा सरनाईक यांनी केला आहे. या निधीतून उभारलेल्या प्रकल्पाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरही आपल्या योगदानाची दखल घेतली गेली नसल्याचे त्यांनी नमूद केले.writing article content here...