ठाणे : केंद्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या रेल्वेविषयक स्थायी समितीवर खासदार नरेश म्हस्के यांची नियुक्ती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकसभा गट नेते डॉ .श्रीकांत शिंदे यांचे खासदार नरेश म्हस्के यांनी याबद्द्ल आभार मानले आहेत.
खासदार नरेश म्हस्के यांना देशाच्या दळणवळण व्यवस्थेचा कणा असलेल्या रेल्वेच्या स्थायी समितीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ खासदार सुधीर गुप्ता काम पाहणार आहेत.
यापूर्वी नरेश म्हस्के यांना नगरविकास आणि गृहनिर्माण समितीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्याचबरोबर वक्फ सुधारणा विधेयक, कंपनी कायदा सुधारणा विधेयक तसेच आता परदेशी देणगी (अधिनियम ) सुधारणा (एफसीआरए) या कायदा बनविण्याऱ्या संयुक्त संसदीय समितीवर, दळणवळण मंत्रालयातील हिंदी भाषा सुरक्षा समितीवरही नरेश म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखालील रेल्वेच्या सल्लागार समितीमध्येही नरेश म्हस्के हे काम करीत आहेत. तसेच आता स्थायी समितीवरही काम करण्याची संधी या वेळी देण्यात आली आहे. माझ्यासाठी मुंबई, ठाणे, कल्याण तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील रेल्वेशी संबंधित प्रश्न आणि विकासकामे प्रभावीपणे मांडण्यासाठी एक मोठं व्यासपीठ ठरणार असल्याची प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के माध्यमांशी बोलताना दिली.
मुंबई आणि ठाणे परिसरातील वाढती लोकसंख्या, प्रवाशांची संख्या, रेल्वेवरील वाढता ताण, उपनगरीय रेल्वेच्या सुविधा, नवीन प्रकल्प, स्थानकांचा विकास तसेच महाराष्ट्रातील रेल्वेच्या विविध प्रलंबित प्रश्नांना या माध्यमातून अधिक प्रभावीपणे मांडता येईल, असा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला.