ठाणे: ठाणे महापालिकेचा तीन हात नाका येथील पदपथ कोणतीही परवानगी न घेता खोदणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या ठेकेदाराच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे.
तीन हात नाका येथून ज्ञानसाधना महाविद्यालय या सेवा रस्त्यावरील पदपथ सुस्थितीत होता. या भागातील जागरूक नागरिक त्याची निगा राखत असतात. दोन दिवसांपूर्वी या भागातील वीजप्रवाह खंडित झाल्याने वीज वितरण कंपनीच्या ठेकेदाराने पदपथ खोदून ठेवला होता. त्याचा त्रास जागरूक नागरिकांना सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना होऊ लागला. स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी या भागाचे उप कार्यकारी अभियंता श्री. जवळकर यांच्याकडे तक्रार केली. चांगले पदपथ खोदणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या ठेकेदाराला नोटीस देऊन दंड वसुल करण्यापेक्षा त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी श्री.रेपाळे यांनी उप नगरअभियंता श्री. कलाल यांच्याकडे केली होती.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उप अभियंता श्री. जवळकर यांनी वीज वितरण कंपनीच्या ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दखल करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या नगर अभियंता यांच्याकडे पाठवला असून त्याला मंजुरी मिळताच ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
प्रभागातील पदपथ तसेच रस्ते स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता रस्ता किंवा पदपथ खोदले जात असतील तर गुन्हा दाखल केला पाहिजे, असे नगरसेवक विकास रेपाळे यांनी स्पष्ट केले.