अंबरनाथ : अंबरनाथ रेल्वे स्थानकातील लोहमार्ग पोलिस स्थानकाचे उद्घाटन लोहमार्ग पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे यांच्या हस्ते आज झाले.
रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांसाठी विविध सुविधा देण्याचे काम सुरू आहे. रेल्वे प्रवाशांची सुरक्षा बळकट होऊन त्यांना तातडीने मदत रेल्वे पोलिस स्थानकाचे माध्यमातून उपलब्ध होणार आहे. या नव्या पोलिस स्थानकामुळे कल्याण लोहमार्ग पोलिसांवरील ताण कमी होणार आहे. कल्याण-कर्जत रेल्वे मार्गावर यापूर्वी कल्याण आणि कर्जत असे दोन लोहमार्ग पोलीस ठाणे असल्यामुळे अंबरनाथ किंवा बदलापूर स्थानकांवर मोबाईल चोरी, पाकीटमारी किंवा कोणतीही अनुचित घटना घडल्यास प्रवाशांना तक्रार नोंदवण्यासाठी थेट कल्याण गाठावे लागत होते. यामुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाया जात होता शिवाय त्यांना मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत होते. आता अंबरनाथ रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलीस ठाणे सुरू झाल्यामुळे कल्याण रेल्वे पोलिसांवरील कामाचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल.
लोहमार्ग पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे, मध्य रेल्वेचे डीआरएम हिरेश मीना, रेल्वे सुरक्षा बलाचे मुख्य आयुक्त विवेक सागर, अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस आयुक्त राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त सुनिता साळुंखे-ठाकरे, पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त राहुल राज, सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा कुलकर्णी, पोलीस उपायुक्त सचिन गोरे, अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, अंबरनाथ लोहमार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण, अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते.
अंबरनाथ लोहमार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर असे तीन रेल्वे स्थानक असणार आहेत. लोकार्पण झालेल्या नव्या रेल्वे पोलीस ठाण्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वे गाड्यांमधील आणि स्थानकांवरील वाढती गर्दी, महिला प्रवाशांची सुरक्षा आणि चोऱ्यांच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पोलीस ठाणे तत्परतेने काम करेल, असा विश्वास वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.