* ४०हून अधिक रुग्ण आढळले
* पाणी टंचाईमुळे पाण्याची साठवण पडली महागात
ठाणे : कळवा पूर्व भागातील भास्करनगर येथे पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी नागरिकांनी साठवलेल्या पाण्यामुळे या भागातील अनेक जणांना डेंग्यूची लागण झाल्याने या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
भास्कर नगर, पौडपाडा, वाघोबानगर येथे मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टीमध्ये नागरिक राहत असून या भागातील नागरिकांना डेंग्यूची लागण झाली आहे. अनेक गरीब नागरिकांवर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात देखिल उपचार सुरु असल्याने या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक जण तापाने फणफणले असून प्लेटलेट्स देखिल कमी झाल्याचे आढळून येत आहे. ही डेंग्यूची लक्षणे असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचे म्हणणे आहे.
या परिसराचे माजी नगरसेवक तसेच माजी उपमहापौर गणेश साळवी यांनी अनेक रुग्णांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज तसेच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून महापालिका प्रशासनाकडे तक्रार देखिल केली आहे. तसेच रहिवाशांना पाण्याची अनेक दिवस साठवण करू नका, अशा सूचना केल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने या भागात धूर फवारणी केली असून पाण्याचे नमुने तपासणीकरिता पाठवले आहेत.
हा भाग उंचावर असल्याने या भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागातील नागरिकांना १० ते १५ दिवसांतून एकदा महापालिकेचे पाणी येत असल्याने येथील नागरिक मोठ्या प्रमाणावर पाणी साठवून ठेवत आहेत. त्या स्वच्छ पाण्यात डेंग्यूचे डास निर्माण होतात. आमचे कर्मचारी अनेक दिवस पाणी साठवण्याला विरोध करतात. साठवलेले पाणी फेकण्याचा प्रयत्न करतात, परंतु नागरिक विरोध करत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ठाणे शहरात ८० डेंग्यूचे रुग्ण आणि मलेरियाचे १३६ रुग्ण आढळले आहेत. शहरात धूर फवारणी करण्यात येत आहे. भास्करनगर येथे देखिल धूर फवारणी करण्याचे आदेश दिले असून पाण्याचे नमुने तपासणीकरिता पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.