जिल्हा
ठाण्यातील १४ ठिकाणांवर दरडींचे सावट
ठाण्यातील १४ ठिकाणांवर दरडींचे सावट
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : घाटकोपरमध्ये दरड कोसळून आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर ठाण्यातील दरडींच्या बाजूला असलेल्या इमारती आणि चाळींमधील हजारो नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरू लागली आहेत. ठाण्यात कळवा मुंब्र्यासह १४ ठिकाणे ही दरडींच्या सावटाखाली असल्याने प्रशासन कोणती कारवाई करते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
घाटकोपर येथे दरड कोसळून आठ लोकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर ठाण्यातील डोंगर पट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. ठाणे एकीकडे मोठ्या प्रमाणात विस्तारत असताना दुसरीकडे गेल्या २० ते २५ वर्षांपासून डोंगरभागात अनधिकृत वस्ती देखील मोठ्या प्रमाणात वाढली. मतांच्या राजकारणासाठी इथल्या स्थानिक पुढाऱ्यांनी सर्व सुखसोयी इथल्या रहिवाशांना पुरवल्या आहेत. या सुखसोयीमुळेच गेल्या अनेक वर्षांपासून लाखभर रहिवासी या ठिकाणी राहत आहेत. अक्षरशः डोंगर पोखरून या परिसरात मोठ्या प्रमाणात या झोपड्या उभ्या राहिल्या आहेत.
शहरातील वागळे इस्टेट पट्ट्यातील डोंगराळ परिसराबरोबरच सर्वाधिक अतिक्रमण हे कळवा आणि मुंब्रा परिसरातील डोंगराळ भागात झाले आहे. अनेक वर्षांपासून या परिसरामध्ये हे नागरिक अनधिकृतपणे राहत असून त्यांना पाणी आणि वीजजोडणी देखील सहज उपलब्ध होत आहे. कळवा परिसरातील आतकोनेश्वर नगर, भास्कर नगर, पौडपाडा असा मोठा डोंगराचा परिसर या झोपड्यांनी व्यापला आहे तर मुंब्रा बायपासवर झोपड्यांचे साम्राज्य प्रशासनाच्या डोळ्यादेखत उभे राहिले आहे.
डोंगराच्या परिसरात राहणाऱ्या सर्व रहिवाशांना पालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी नोटीस देण्यात येते. राहत असलेल्या जागा सोडून जाण्यास सांगितले जाते. वन विभागाकडून देखील केवळ नोटीस देण्याचे सोपस्कार पाळले जातात. मात्र प्रत्यक्षात निवारा जाऊ नये आणि पावसात राहायला कुठे जायचे या विवंचनेत असलेले रहिवासी जीव मुठीत घेऊन त्याच ठिकाणी मृत्यूच्या छायेत राहत असल्याचे समोर आले आहे.
या डोंगराळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झोपड्यांचे साम्राज्य वाढले असून नेमके किती रहिवाशी या परिसरामध्ये राहत आहेत याचा सर्व्हे देखील पालिकेच्या वतीने करण्यात आलेला नाही. अनेकांनी तर या ठिकाणी झोपड्या बांधून त्या भाड्याने दिल्या आहेत. यामध्ये राहणाऱ्या नागरिकांची जास्त संख्या ही परराज्यातून आलेल्या नागरिकांची आहे.
झोपड्या बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरला जात असल्याने पावसाळ्यात डोंगरामध्ये मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे माती देखील भुसभुशीत होत असून या परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांना याचा सर्वाधिक धोका आहे.
या भागात कोसळू शकते दरड
लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती हद्दीत गुरुदेव आश्रम जवळ, उपवन, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात डोंगरीपाडा, पातलीपाडा, कळशीपाडा, कळवा प्रभाग समिती क्षेत्रात आतकोनेश्वर नगर, पौंडपाड़ा, शिवशक्ती नगर, घोलाई नगर, वाघोबा नगर, भास्कर नगर, मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात आझाद नगर, गावदेवी मंदिरजवळील परिसर, केणी नगर, सैनिक नगर, कैलास नगर
300x450
300x600