* ५६७ वाहनांसाठी व्यवस्था
* नौपाड्याची कोंडी फुटणार
* गाळेधारकांना नोटीसा
ठाणे: मागिल अनेक दिवस रखडलेल्या नौपाड्यातील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या शाहू मार्केटच्या जागी पार्किंग प्लाझा उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
ठाणे महानगरपालिकेने शाहू मार्केटमधील ७५ गाळेधारकांना गाळे आठ दिवसांत रिकामे करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. या जागेवर पार्किंगसह व्यापारी संकुल उभारण्यात येणार असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सध्याच्या गाळेधारकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे पार्किंगच्या समस्येने त्रस्त असलेल्या नौपाड्याला हक्काच्या पार्किंगची सुविधा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शाहू मार्केटमधील गाळ्यांच्या वापरावरून काही दिवसांपूर्वी झालेल्या महासभेत जोरदार चर्चा झाली होती. काही गाळेधारकांनी गाळे पोटभाड्याने दिल्याचा मुद्दा नगरसेवकांनी उपस्थित केला होता. गाळ्यांच्या बेकायदा खरेदी-विक्री आणि हस्तांतरणावरूनही प्रशासनावर प्रश्न उपस्थित झाले होते. असे असले तरीही शाहू मार्केटच्या जागेवर पार्किंग प्लाझा व व्यापारी संकुल उभारण्याच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे. याआधी याचे नियोजन महापालिकेच्या अर्थसंकल्पातही करण्यात आले होते. त्या दिशेने पावले उचलत प्रशासनाने या प्रकरणी कार्यवाही करत ७५ गाळेधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. आठ दिवसांत गाळे रिकामे करण्याचे निर्देश नोटिशीत देण्यात आले आहेत.
शाहू मार्केटची जागा नौपाड्याच्या मध्यवर्ती भागात असल्याने या ठिकाणी पार्किंग प्लाझा उभारल्यास परिसरातील वाहतूक व्यवस्थेला मोठा आधार मिळणार आहे. महात्मा गांधी रोड, राम मारुती रोड, जांभळी नाका आणि ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहनांची मोठी वर्दळ असते. व्यापारी, ग्राहक तसेच स्थानिक रहिवाशांची वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने अनेकदा वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होते. नव्या प्रकल्पामुळे या वाहनांना नियोजित पार्किंगची जागा उपलब्ध होणार आहे.
पाच मजल्यांचे व्यापारी संकुल
महापालिकेच्या नियोजनानुसार सुमारे ७० कोटी १९ लाख रुपये खर्चाचा हा प्रकल्प प्रस्तावित आहे. यात तळघरात दुचाकींसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. लोअर तळमजल्यावर दुकाने आणि ग्राहक पंचायत कार्यालय, तर अप्पर तळमजल्यावर दुकाने असतील. त्यावरील पाच मजल्यांवर दुकाने आणि कार्यालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
नौपाडा हा ठाण्यातील जुन्या आणि गजबजलेल्या व्यापारी भागांपैकी एक आहे. शाहू मार्केटसह राम मारुती रोड, जांभळी नाका आणि ठाणे रेल्वे स्थानक परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. जुन्या इमारतींमध्ये मर्यादित पार्किंग असल्याने रहिवाशांसह ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी राहतात. त्यामुळे रस्त्यांची क्षमता कमी होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो.
सध्या परिसरातील पार्किंगची गरज भागविण्यासाठी गावदेवी येथील भूमिगत पार्किंगसह विविध ठिकाणी पार्किंगची सुविधा आहे. मात्र शाहू मार्केटच्या मध्यवर्ती जागेतच मोठी पार्किंग क्षमता निर्माण झाल्यास बाजारपेठेत येणाऱ्या वाहनधारकांना अधिक सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रस्तावित पार्किंग प्लाझा हा केवळ व्यापारी संकुलाचा प्रकल्प न राहता नौपाड्याच्या वाहतूक व्यवस्थेसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे.
प्रस्तावित प्रकल्पात ३२० चारचाकी आणि २४७ दुचाकी, अशा एकूण ५६७ वाहनांसाठी पार्किंगची क्षमता निर्माण होणार आहे. पार्किंग टॉवरमध्ये तळमजल्यासह २० स्तरांची व्यवस्था प्रस्तावित आहे. त्यामुळे सध्याच्या रस्त्यावरील पार्किंगचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
शाहू मार्केटमधील गाळे रिकामे करण्याच्या नोटिसा बजावल्यानंतर गाळेधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही महत्त्वाचा ठरणार आहे. पार्किंगसह व्यापारी संकुल उभारल्यानंतर सध्याच्या गाळेधारकांचे पुनर्वसन करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या बांधकामास सुरुवात करण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे.