१० वर्षांसाठी तीन हजार कोटींचा खर्च अपेक्षित
ठाणे : शहरातील साफसफाईची समस्या दूर करण्यासाठी ठाणे महापालिकेने शहर चकाचक ठेवण्यासाठी अत्याधुनिक आणि सर्वसमावेशक यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यांची साफसफाई कचऱ्याची वाहतूक आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी दहा वर्षांकरिता सुमारे ३३०० कोटी रुपयांचा ‘सिटी क्लिनिंग’ प्रकल्प राबविण्यात येणार असून त्याच्या निविदा देखिल मागिल आठवड्यात काढण्यात आल्या आहेत.
महापालिका क्षेत्रात सध्या दररोज सुमारे ११०० ते १३०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्याची साफसफाई छोट्या ठेकेदारांमार्फत तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत केली जाते. महापालिकेच्या घनकचरा विभागामार्फत त्याचे नियोजन केले जाते. ठाणे शहराची लोकसंख्या १८ लाखांवरुन २७ लाखांवर आल्याने शहरातील कचऱ्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आणि कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने आखणी करण्यात आली आहे.
सिटी क्लीन प्रकल्पासाठी कळवा, मुंब्रा आणि दिवा, परिमंडळ एक, माजिवडा, मानपाडा आणि उथळसर परिमंडळ दोन, लोकमान्य, वर्तकनगर, कोपरी-पाचपाखाडी आणि वागळे परिमंडळ तीन या तिन्ही परिमंडळांसाठी तीन स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या आहेत. पहिल्या वर्षासाठी प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे २५० कोटी रुपये, तर १० वर्षांच्या कालावधीतील खर्च सुमारे ३३०० कोटी रुपये अपेक्षित आहे. या प्रकल्पांतर्गत झोपडपट्टी, गृहसंकुले, वाणिज्यिक आस्थापना आणि बाजारपेठांमधून घराघरातून कचरा संकलन व वाहतूक केली जाणार आहे. पारंपरिक तसेच यांत्रिक पद्धतीने रस्त्यांची सफाई केली जाणार आहे. आधुनिक वाहनांचा वापर, कचऱ्याचे निर्मितीच्या ठिकाणीच वर्गीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. शहरातील स्वच्छतेवर देखरेख ठेवण्यासाठी आधुनिक कमांड सेंटर उभारण्यात येणार असून प्रत्यक्ष कामकाजाचे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निरीक्षण केले जाणार आहे. नागरिकांच्या तक्रारींसाठी २४ तास सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती घनकचरा विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
शहराच्या स्वच्छतेची गुणवत्ता कायम राहावी यासाठी कंत्राटदाराला केवळ कामाच्या प्रमाणावर नव्हे तर गुणवत्तेवर पद्धतीनुसार बिलातून खर्चासाठी ५०टक्के रक्कम निश्चित केली जाणार आहे. उर्वरित ५० टक्के रक्कम कामगिरीच्या निकषांशी जोडली जाणार आहे. कामगिरीत त्रुटी आढळल्यास त्यानुसार दंडाची रक्कम वजा केली जाणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वर्कशॉप, पार्किंग लॉट यांसारख्या स्थायी मालमत्ता महापालिकेकडे हस्तांतरित होणार आहेत. त्यामुळे भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि कचरा निर्मिती लक्षात घेऊन ठाणे शहराच्या स्वच्छतेला एकात्मिक आणि आधुनिक स्वरूप देण्याचा पालिकेचा प्रयत्न असल्याचे घनकचरा विभागाचे उपायुक्त मधुकर बोडके यांनी सांगितले.