ठाणे : देशभरातून आलेल्या ५१ लघुपटांमधून अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या ११ लघुपट पाहण्याचा अनुभव ठाणेकरांना घेता येणार आहे.
‘टॅग’ संस्थेच्या ‘चित्रगंध’ उपक्रमांतर्गत राष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलची अंतिम फेरी बुधवार, ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत गडकरी रंगायतन येथे होणार आहे. या महोत्सवात मराठी, हिंदी आणि बंगाली भाषांतील लघुपट सादर केले जाणार आहेत.
टॅग संस्थेच्या चित्रगंध उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी देशभरातून ५१ लघुपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. त्यातून अंतिम फेरीसाठी ११ लघुपटांची निवड करण्यात आली आहे. विविध विषयांवरील मराठी आणि हिंदी लघुपटांसह एका बंगाली लघुपटाचाही यामध्ये समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या गटातून ओंकार कांबळे यांचा ‘परतफेड’ आणि अतुल चौगुले यांचा ‘नजर’ हे दोन लघुपट अंतिम फेरीत पोहोचले आहेत.
या महोत्सवाला मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक आणि कलाकारांसह नुकत्याच ऑस्करसाठी निवड झालेल्या ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष डावखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच लेखक-दिग्दर्शक विजय मौर्य यांची विशेष उपस्थिती असणार आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईतील दादर येथील रवींद्र नाट्यमंदिरात झाली होती. यंदा प्रथमच अंतिम फेरीसाठी ठाण्यातील गडकरी रंगायतनची निवड करण्यात आली आहे. विविध भाषांतील लघुपट पाहण्याची संधी ठाणेकरांना मिळणार आहे.