जिल्हा

बड्या कंत्राटदारासाठी सात कोटींचे टेंडर?

बड्या कंत्राटदारासाठी सात कोटींचे टेंडर?
बड्या कंत्राटदारासाठी सात कोटींचे टेंडर? फोटो: ठाणे वैभव

नगरसेवक राजेंद्र फाटक यांनी केला पर्दाफाश

ठाणे : ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये एका बड्या कंत्राटदारासाठी सात कोटींचे टेंडर देण्याचा घाट ठाणे महापालिकेने घातला असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. हा घोटाळा सत्ताधारी शिवसेना पक्षाचे नगरसेवक राजेंद्र फाटक यांनीच उघड केला आहे.

वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील विविध रस्त्यांच्या चरांचे पृष्ठीकरण करण्याचे काम एका कंत्राटदाराला देण्यासाठी हा घोटाळा करण्यात आला असून विशेष म्हणजे महासभेची मान्यता नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा उघडण्यात आल्याने नगरसेवक राजेंद्र फाटक यांनी मंगळवारी प्रभाग समितीमध्ये आंदोलन केले. संबंधित कार्यकारी अभियंत्याला निलंबित करून हे टेंडर रद्द करण्यात यावे  अशी मागणी त्यांनी केली असून कारवाई न झाल्यास फाटक यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.

वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील जवळपास १६ रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तयार करण्यात आला. यामध्ये विविध रस्त्यांमधील चरांचे पुष्टीकरण करण्याचे काम करण्यात येणार असून यासाठी महापालिका तब्बल सात कोटी दोन लाखांचा खर्च करणार आहे. मात्र हा प्रस्ताव आता वादाच्या भोवऱ्यात सापडला असून यावरून प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहे. या प्रस्तावावरून यापूर्वी झालेल्या महासभेतही गोधळ झाला असून फाटक यांनी या कामाला सर्वसाधारण सभेत विरोध दर्शवला होता. फाटक यांनी प्रशासनावर गंभीर आरोप देखील केले होते. नक्की कोणाचे पुनर्पृष्ठीकरण करणार आहात?  कार्यकारी अभियंत्यांचे की ठेकेदाराचे? एवढे मोठे टेंडर काढले जाते. यापूर्वीही वर्तकनगर प्रभागासाठी रस्त्यांवरील चरांच्या पुनर्पृष्ठीकरणासाठी चार कोटींचे टेंडर काढण्यात आले होते; परंतु काहीही काम झाले नव्हते. आता पुन्हा तेच टेंडर सात कोटींचे काढण्यात आले आहे. हा विषय  सभागृहात अद्याप मंजूर झालेला नाही; परंतु त्याचे टेंडर काढण्यात आले असल्याचे फाटक यांनी सांगितले. ६० ते ७० लाखांचे किंवा एक कोटींचे काम असताना महापालिकेचे अधिकारी आणि अभियंते सात कोटींचे  टेंडर काढतात! नक्की काय चालले आहे? असा प्रश्न फाटक यांनी उपस्थित केला. दुसरीकडे हे टेंडर केवळ एका बड्या कंत्राटदारासाठी काढण्यात आले असून बाकीच्या लोकांना काहीही न कळवता, त्या एका कंपनीच्या लोकांना फक्त कागदपत्रे सादर करण्याची माहिती देण्यात आली आणि दुसऱ्या कंपनीला त्यांची कागदपत्रे नसल्यामुळे त्यांचे टेंडर बाद करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले असा आरोप देखील त्यांनी केला.।नगर अभियंत्यांनी स्वतः या कागदपत्रांची चौकशी करावी आणि तोपर्यंत ते टेंडर थांबवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली होती.

सभागृहात टेंडर थांबवण्याचा निर्णय झाला असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सोमवारी हे टेंडर उघडण्यात आल्याने नगरसेवक फाटक यांनी प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता राणे यांना प्रभाग समितीमध्ये जाऊन जाब विचारत आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी महापालिकेत जाऊन महापौर शर्मिला पिंपळोलकर तसेच शिवसेनेचे गटनेते पवन कदम तसेच सभागृह नेते हणमंत जगदाळे यांची भेट घेऊन हे टेंडर रद्द करावे तसेच संबंधित कार्यकारी अभियंता राणे यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची कारवाई करावी, अशी मागणी केली. कारवाई न झाल्यास मी माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा देईन असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

यासंदर्भात महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या दालनात नगरसेवक राजेंद्र फाटक आणि संबंधित अधिकारी यांची एक बैठक देखील झाली. या बैठकीला शिवसेनेचे गटनेते पवन कदम हे देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेण्यात आला? टेंडर रद्द होणार का अशी विचारणा करण्यात आल्यानंतर कोणतीही माहिती देण्यात आली नाही. केवळ राजेंद्र फाटक यांची समजूत काढण्यात आली असल्याचे महापौरांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475