सध्याच्या युगात महिला कोणत्याच क्षेत्रात मागे राहिल्या नसून नवनवीन आव्हाने पेलण्यासाठी त्या सज्ज असतात. मग ते क्षेत्र डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस अथवा वकिलीचे असो, महिला या क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवत आहेत. प्रारंभी एका वरिष्ठ गुन्हेगारी वकिलांकडे प्रशिक्षण घेतल्यानंतर २००८ मध्ये स्वतंत्र वकिली व्यवसाय सुरू करून आपल्या कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर विविध गुन्हेगारी प्रकरणांमध्ये न्याय मिळवून देण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या ॲडव्होकेट रेखा हिवराळे यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. न्यायव्यवस्थेत आपले महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आणि कठोर मेहनतीने स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या ॲड. हिवराळे मध्य प्रदेशमधील इंदौर येथे जन्मलेल्या असून हिंदी माध्यमातून त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले आहे. वकिली क्षेत्रात स्वतःचे वेगळेपण त्यांनी सिद्ध केले आहे. हिंदी हीच मुख्य भाषा वापरणाऱ्या ॲड. हिवराळे यांनी मात्र मराठी आणि इंग्रजी या भाषाही आत्मसात केल्या. लग्नानंतर ठाण्यात स्थायिक झाल्यावर त्यांनी २००५ पासून वकिली व्यवसायात आपल्या प्रॅक्टिसला सुरुवात केली. त्यांच्या कार्यक्षेत्राचा विस्तार ठाणे, नवी मुंबई, कल्याण, पनवेल, पाली (गुजरात) आदी ठिकाणी झाला. २०१६ मध्ये त्यांची अतिरिक्त सरकारी वकील आणि विशेष सरकारी वकील (पोक्सो) म्हणून नियुक्ती झाली, तर २०१७ मध्ये त्यांना अॅट्रॉसिटी केसेससाठी विशेष सरकारी वकील म्हणून जबाबदारी देण्यात आली. व्यवसायासोबतच त्या समाजसेवेतही सक्रिय आहेत. मोफत कायदेशीर सल्ला, सामाजिक पुस्तक लेखन, महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन यांसारख्या उपक्रमांमध्ये त्या सातत्याने योगदान देतात. ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या खजिनदार पदावर कार्यरत असलेल्या ॲडव्होकेट रेखा हिवराळे यांनी आपल्या निःस्वार्थ सेवा आणि कठोर परिश्रमाने न्यायव्यवस्थेत भरीव योगदान दिले आहे. त्यांचा हा संघर्षमय प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो.
GENERAL
धाडसी आणि निःस्वार्थी रणरागिणी ॲड. रेखा हिवराळ
धाडसी आणि निःस्वार्थी रणरागिणी ॲड. रेखा हिवराळ
फोटो: ठाणे वैभव
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475