वाढत्या लोकसंख्येनुसार वाहतूक व्यवस्थेत वाढ झाली असून वाहतुकीचे नियमन करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. शहरामध्ये वाहतूक समस्येने आ वासून उभ्या आहेत. आजच्या गतिमान युगात वाहतूक नियंत्रण करणे ही एक मोठी जबाबदारी आहे. पूर्वी या क्षेत्रात पुरुषांचे वर्चस्व होते, मात्र आता क्षेत्रात महिला अधिकारीही समर्थपणे कार्यरत असल्याचे दिसून येते. ठाण्यातील कापूरबावडी वाहतूक उपविभागाच्या पोलीस निरीक्षक मंजुषा भोगले या वाहतूक नियंत्रणाचे उत्कृष्ट व्यवस्थापन करत असून, समाजातील महिलांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरल्या आहेत. २००६ मध्ये महाराष्ट्र पोलीस अकॅडमीतून प्रशिक्षण घेतल्यानंतर मंजुषा यांची राज्य गुप्तचर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. २०२३ मध्ये ठाण्यात बदली झाल्यानंतर त्यांनी कापूरबावडी वाहतूक उपविभागाचा कार्यभार स्वीकारला. कापूरबावडी जंक्शन अनेक महामार्गांना जोडले असल्याने येथे वाहतूक कोंडी मोठी समस्या आहे. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून मंजुषा मॅडम सातत्याने प्रयत्नशील असतात. वाहतूक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वाहतूक कोंडी सोडवणे, अपघात झाल्यास त्वरित मदत करणे, नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना तोंड देणे, प्रभावशाली व्यक्तींसोबत संवाद साधणे आणि मोठ्या सण-उत्सवांमध्ये गर्दीचे नियोजन करणे ही मोठी आव्हाने त्यांच्यासमोर आहेत. तसेच, मुसळधार पाऊस किंवा धुक्यामुळे वाहतूक नियंत्रित करणे कठीण होते. काही वेळा वाहन चालक ट्रॅफिक पोलिसांवर चिडतात, विरोध करतात, अशा वेळी संयमाने कायद्याच्या चौकटीत राहून परिस्थिती हाताळणे आवश्यक असते. महिला अधिकारी असल्याने काही अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात दीर्घकाळ उभे राहण्याची शारीरिक मर्यादा, मानसिक दबाव, लोकांचा भेदभाव, घर-नोकरीतील समतोल राखण्याचे आव्हान आणि महिला सुरक्षेशी संबंधित विशेष जबाबदाऱ्या या अडचणींना सामोरे जावे लागते. वाहतुकीचे नियम पाळले जावेत म्हणून मंजुषा मॅडम आणि त्यांचा विभाग विविध उपक्रम राबवतात. नियम मोडणाऱ्यांना त्वरित दंड (चलान) लावणे, वारंवार उल्लंघन करणाऱ्यांचे लायसन्स निलंबित करणे, ई-चलान पाठवणे, हेल्मेट आणि सीटबेल्ट तपासणी मोहीम, शाळा-महाविद्यालयांत जनजागृती कार्यक्रम, सोशल मीडियाद्वारे माहिती प्रसार आणि तरुण वाहनचालकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम यांचा या उपक्रमात समावेश आहे.
GENERAL
वाहतूक शिस्त पोलिसांप्रमाणे नागरिकांचीही जबाबदारी-मंजुषा भोगले
वाहतूक शिस्त पोलिसांप्रमाणे नागरिकांचीही जबाबदारी-मंजुषा भोगले
फोटो: ठाणे वैभव
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475