जिल्हा
शाळांच्या प्रवेशद्वारापासून ५० मीटरमध्ये खाद्यपदार्थ विक्रीस बंदी
शाळांच्या प्रवेशद्वारापासून ५० मीटरमध्ये खाद्यपदार्थ विक्रीस बंदी
फोटो: ठाणे वैभव
भाईंदर : शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यातील सर्व शाळांच्या प्रवेशद्वारापासून ५० मीटर परिसरातील खाद्यपदार्थ विक्री, जाहिरात, विपणन तसेच मोफत वितरणावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केलेल्या या आदेशामुळे आता मीरा-भाईंदरमधील शाळांच्या परिसरात उभ्या असलेल्या चिप्स, कोल्ड्रिंक्स, पाकीटबंद खाद्यपदार्थ, तळलेले पदार्थ, साखरयुक्त पेये (जंक फूड) विकणाऱ्या टपऱ्या, दुकाने आणि हातगाड्यांवर कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे. मीरा-भाईंदरमध्ये बहुतांश शाळांच्या प्रवेशद्वाराबाहेर विद्यार्थ्यांना आकर्षित करणाऱ्या विविध खाद्यपदार्थांच्या टपऱ्या, स्टॉल आणि किरकोळ दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. शाळा सुटण्याच्या वेळेत या ठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी असते. त्यामुळे सर्व ठिकाणांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. एफडीएच्या आदेशानुसार शाळेच्या प्रवेशद्वारापासून ५० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारचे 'जंक फूड' विकता येणार नाही. यामध्ये तळलेले वेफर्स, थंड पेय, एनर्जी ड्रिंक्स, गोळ्या, चॉकलेट्स, अत्याधिक मीठ, साखर किंवा चरबी असलेले खाद्यपदार्थ, तळलेले तसेच प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा समावेश होतो. तसेच अशा पदार्थांची जाहिरात, प्रचार, विद्यार्थ्यांना मोफत वाटप किंवा प्रलोभन देणाऱ्या कोणत्याही उपक्रमालाही पूर्णतः बंदी याशिवाय शाळांमधील भोजन केंद्रे, वसतिगृहातील स्वयंपाकगृहे, मध्यान्ह भोजन पुरवठादार तसेच अन्नपुरवठा करणाऱ्या सर्व व्यावसायिकांकडे वैध परवाना किंवा नोंदणी असणे बंधनकारक आहे.
परवान्याशिवाय नसणाऱ्यांवरही नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. मात्र पाळणाघरे आणि डे-केअर केंद्रांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. लहान वयात लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, दातांचे आजार, पचनाच्या तक्रारी तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्यास हे पदार्थ कारणीभूत ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पौष्टिक आणि संतुलित आहाराची सवय लागावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
300x450
300x600