खासदार नरेश म्हस्के यांचा ठाकरे गटाला टोला
ठाणे: प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे. पूर्णेकर कुटुंबाशी माझे वैयक्तिक संबंध असून, जयनाथ पूर्णेकर आजही माझे मित्र आहेत. त्यामुळे या कुटुंबाच्या दुःखाशी आम्ही जोडलेलो आहोत. मात्र, या दुर्दैवी घटनेचा आधार घेऊन उद्धव सेनेचे नेते आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकविण्यासाठी राजकारण करीत आहेत, असा आरोप खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे.
ठाण्यात कोणताही गुन्हा घडला की त्याचे खापर एकनाथ शिंदे यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला जातो. ठाण्यात झालेला पराभव आणि त्यातून निर्माण झालेली अस्वस्थता यामुळे प्रत्येक घटनेत शिंदे यांना जबाबदार धरण्याचे राजकारण सुरू असल्याचा टोला म्हस्के यांनी लगावला आहे.
पूर्णेकर हत्या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी स्वतः चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे तपास यंत्रणेला आपले काम करू द्यावे, जो कोणी आरोपी असेल, त्याला कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही. पूर्णेकर कुटुंबाला प्रामाणिक न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले.
एफआयआरमध्ये नाव असल्याच्या मुद्द्यावरून उद्धव सेनेकडून प्रश्न उपस्थित केले जात असतील, तर दिशा सालियान प्रकरणाचाही विचार करावा. गेली सहा वर्षे दिशाचे वडील पोलीस यंत्रणांकडे आपल्या लेकीच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी म्हणून वणवण भटकत आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे या प्रकरणात सात वेळा नाव असल्याचा दावा करीत नरेश म्हस्के यांनी, ‘एका प्रकरणात एफआयआरमधील नावांवरून प्रश्न उपस्थित करायचे आणि दुसऱ्या प्रकरणात वेगळी भूमिका घ्यायची, हा दुहेरी न्याय कशासाठी?’ असा सवाल त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी पुरावे नष्ट केले. या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून अटक होण्याची तयारी दर्शवली तर मीनाक्षी शिंदे याही स्वतः अटकेला सामोरे जातील, असे आव्हान खासदार नरेश म्हस्के यांनी दिले आहे.
‘संजय राऊत, या प्रकरणात राजकारण करू नका.
सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप टाकून वातावरण तापविण्यापेक्षा पोलिसांना तपास करू द्या,’ असे आवाहनही नरेश म्हस्के यांनी केले आहे.
‘पूर्णेकर कुटुंबावर प्रेम असेल तर राजकारण नको’
पूर्णेकर हे क्लस्टरच्या बाजूने होते. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्याची माझी इच्छा होती. मात्र, चुकीचे गैरसमज पसरविण्याचे राजकारण केले जात असल्याने त्या वेळी त्यांच्या घरी जाणे टाळले. योग्य वेळी नक्कीच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेईन, असे नरेश म्हस्के यांनी सांगितले.
संजय राऊत यांना राष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्धी मिळवायची असल्याने ते प्रत्येक प्रकरणात अमित शहा यांचे नाव घेतात, असा टोलाही त्यांनी लगावला. ‘पूर्णेकर कुटुंबीयांबद्दल खरोखरच प्रेम असेल तर त्यांच्या हत्येच्या मूळ आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा. या घटनेचे राजकारण करू नका,’ असे नरेश म्हस्के म्हणाले.
‘ठाणे आपल्यासोबत का नाही, आत्मपरीक्षण करा’
ठाण्यातील जनतेने आपल्याला साथ का दिली नाही, याचे आत्मपरीक्षण उद्धव सेनेने करावे. एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची असूया आणि राजकीय पराभवातून प्रत्येक घटनेचे खापर त्यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नरेश म्हस्के यांनी केला.
‘पूर्णेकर कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. आरोपी कोणताही असो, त्याला पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही. मात्र, तपास पूर्ण होण्याआधीच राजकीय आरोप-प्रत्यारोप करून वातावरण दूषित करू नये,’ असे नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले.
‘आपल्या बुडाखाली किती अंधार आहे, तेही बघा!’
मिठी नदी प्रकरणातील दिनो मोरया यांच्या अटकेचा संदर्भ देत खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे. मिठी नदी प्रकरणात दिनो मोरया यांना अटक करण्यात आली आहे. मिठी नदीचे कंत्राट कसे आणि कोणी दिले, हे सर्वांना माहीत आहे. दिशा सालियान प्रकरणातही त्यांचे नाव चर्चेत आले होते. आता दिनो मोरया यांना अटक झाली आहे, त्यामुळे ‘त्यांनाही अटक करा’ असे आपण म्हणायचे का? असा सवाल खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला आहे. दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यापूर्वी आपल्या बुडाखाली किती अंधार आहे, तेही बघा, असा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला.
सपना पाटकर यांना काही झाले तर जबाबदार कोण?
सपना पाटकर प्रकरणाचाही उल्लेख करत नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. सपना पाटकर यांच्यासोबत आपण कोणत्या पद्धतीने शिवीगाळ केली आहे, हेही पाहावे. उद्या सपना पाटकर यांना काही झाले तर त्याला तुम्हाला जबाबदार धरणार का, असा सवाल त्यांनी केला.