१७ वर्षांनंतर वसंत डावखरे मानहानी खटल्याचा निकाल
कल्याण : तब्बल १७ वर्षांपासून कल्याण न्यायालयात सुरू असलेल्या दिवंगत नेते वसंत डावखरे यांच्या मानहानी प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. या प्रकरणात तत्कालीन अखंड शिवसेनेचे उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, माजी खासदार आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर या आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
२००९ च्या कल्याण लोकसभा निवडणुकीदरम्यान एका प्रचारसभेत कथित व्हिडिओ/सीडी दाखवण्यात आल्याच्या प्रकरणातून हा खटला सुरू झाला होता. त्यावेळी आनंद परांजपे आणि वसंत डावखरे यांच्यात कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणूक झाली होती. प्रचारसभेत दाखवण्यात आलेल्या कथित व्हिडिओमुळे आपली बदनामी झाल्याचा आरोप करत वसंत डावखरे यांनी तक्रार दाखल केली होती. या खटल्यात तक्रारदार पक्षाकडून २० पेक्षा अधिक साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. पोलीस अधिकारी आणि तपासी अधिकाऱ्यांचीही साक्ष झाली. त्यानंतर आरोपींची कलम ३१३ अंतर्गत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
ऑगस्ट २०२६ मध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात आपले जबाब नोंदवले होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावरील आरोप नाकारले होते. कथित सीडी, त्यातील एडिटिंग, फॉरेन्सिक अहवाल तसेच तपास प्रक्रियेतील मुद्द्यांवर बचाव पक्षाने प्रश्न उपस्थित केले होते. आरोपींचा कथित व्हिडिओ प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा ठोस पुरावा नसल्याचा दावा बचाव पक्षाकडून करण्यात आला होता. तब्बल १७ वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर आज या प्रकरणाचा अंतिम निकाल लागला असून, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर या सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.