* २१ ऑक्टोबरला निवडणूक प्रक्रिया
* स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीबाबत अनिश्चितता
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग समित्यांच्या सभापती निवडीचा अखेर मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर तब्बल आठ महिन्यांनी प्रभाग समित्यांच्या सभापती निवडीची प्रक्रिया पार पडणार असून, येत्या २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत निवडणूक घेतली जाणार आहे. मात्र, स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर न झाल्याने या निवडींची प्रतीक्षा कायम आहे.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन आठ महिने उलटत आले, तरी प्रभाग समित्यांचे सभापती आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी रखडल्या होत्या. यामुळे महापालिकेच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. विरोधी पक्षांनीही या निवडणुका लवकर घेण्याची मागणी केली होती. दरम्यान, विविध महापालिकांमधील निवड प्रक्रियेसंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशांच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी प्रशासनाने प्रभाग समित्यांच्या सभापती निवडीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
महापालिका सचिवांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, सभापतीपदासाठी इच्छुक उमेदवारांना १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता होणाऱ्या सर्वसाधारण सभेत निवडणूक प्रक्रिया पार पडेल. केडीएमसीमध्ये अ, ब, क, ड, जे, फ, ह, ग, आय आणि ई अशा एकूण दहा प्रभाग समित्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोणत्या पक्षाचे किती सभापती निवडून येतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
प्रभाग समिती सभापतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग येणार असला, तरी स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. उल्हासनगर आणि भिवंडी महापालिकांमध्ये स्वीकृत सदस्यांची निवड झाली आहे. ठाणे महापालिकेतील निवड प्रक्रियेबाबतही न्यायालयाने आदेश दिले आहेत. प्रभाग समिती सभापतींच्या निवडीसोबत स्वीकृत नगरसेवकांची निवडही होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, प्रशासनाने अद्याप त्याबाबत घोषणा केलेली नसल्याने स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.