ठाणे: भारतीय रेल्वेच्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वाधिक गर्दीच्या १० रेल्वे स्थानकांपैकी पाच स्थानके मुंबई आणि मुंबई महानगरातील आहेत. ही पाचही स्थानके मध्य रेल्वे मार्गावरील असून त्यात ठाणे स्थानक सर्वाधिक गर्दीचे आहे. या स्थानकांच्या यादीत कल्याण, पनवेल, दादर आणि सीएसएमटी स्थानकांचाही समावेश आहे. २०२३-२४ च्या आकडेवारीनुसार या पाच स्थानकातून दररोज सुमारे आठ लाख ४० हजार प्रवाशांची वाहतूक होते. यामुळेच पाच स्थानकांत ठाणे स्थानक पहिल्या क्रमांकावर आहे.
किफायतशीर आणि वेगवान प्रवासासाठी प्रवासी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देतात. उपनगरीय रेल्वेसह लांब पल्ल्याची वाहतूक ठाणे, कल्याण, पनवेल, दादर आणि सीएसएमटी स्थानकातून होते. भारतीय रेल्वेच्या २०२३-२४ प्रवासी आकडेवारीनुसार देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानके समोर आली आहेत. या वर्षात नऊ कोटी ३० लाख ६७,२८३ प्रवाशांची नोंद करून ठाणे देशातील सर्वात व्यस्त स्थानक ठरले आहे. कल्याण आठ कोटी ३७ लाख ९२,६६७ प्रवाशांसह दुसऱ्या क्रमांकावर असून, त्याखालोखाल हावडा सहा कोटी १३ लाख २९,३१९ प्रवाशांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. सीएसएमटी येथे पाच कोटी १६ लाख ५२,२३० प्रवाशांची नोंद झाली, तर सियालदाह स्थानकात पाच कोटी १३ लाख ६९,२३० आणि पनवेल येथे चार कोटी ६२ लाख ५८,३७५ प्रवाशांची नोंद झाली. नवी दिल्ली तीन कोटी ९६ लाख ३२,२७२ प्रवाशांसह सातव्या क्रमांकावर आहे, तर चेन्नईचे तांब्रम स्थानक तीन कोटी २७ लाख ८५,१८८ प्रवाशांसह आठव्या क्रमांकावर आहे. दादर येथे तीन कोटी २२ लाख ६९,११६ प्रवाशांची नोंद झाली आणि एमजीआर चेन्नई सेंट्रलने तीन कोटी पाच लाख ९५,८३७ प्रवाशांसह अव्वल १० स्थानकांमध्ये स्थान मिळवले.
देशाच्या उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे नेटवर्कद्वारे हाताळल्या जाणाऱ्या प्रचंड प्रवासी संख्येवर प्रकाश टाकते. ज्यामध्ये मुंबई महानगरातील ठाणे, कल्याण, मुंबई सीएसएमटी, पनवेल आणि दादर या पाच स्थानकांचा पहिल्या १० मध्ये समावेश आहे. संपूर्ण भारतीय रेल्वे दररोज जवळपास २.४ कोटी प्रवाशांची वाहतूक हाताळते, ज्यामुळे ते जगातील सर्वात व्यस्त रेल्वे नेटवर्कपैकी एक बनले आहे.
ठाणे स्थानक उपनगरीय रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे आणि गर्दीचे स्थानक आहे. स्थानकातून कल्याण, कसारा, कर्जतच्या दिशेने लोकलची वाहतूक होते. ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-पनवेल लोकल धावते. याशिवाय लांब पल्याच्या गाड्यांची ये-जा होते.