जिल्हा
अंबरनाथ नगरपालिका शाळेच्या समस्या दूर करण्याच्या हालचाली
अंबरनाथ नगरपालिका शाळेच्या समस्या दूर करण्याच्या हालचाली
फोटो: ठाणे वैभव
'ठाणेवैभव'च्या वृत्तानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी
अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळा क्रमांक नऊमधील असलेल्या दुरावस्थेचे वृत्त प्रसिद्ध होताच नगरपालिकेची प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून शाळेतील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे.
अंबरनाथ नगरपालिकेची शिवमंदिरासमोरील नऊ नंबरच्या शाळेत कमालीची दुरवस्था असून अस्वच्छ वातावरणात आणि रस्त्याची गैरसोय असलेल्या ठिकाणी शाळा भरते आहे. पावसाच्या पाण्याने झालेल्या चिखलातून वाट काढत विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. वर्गात पावसाचे घाणेरडे पाणी, तुटलेली स्वच्छतागृहाची दारे, पावसामुळे भिंतीना ओलावा, अशा अनेक गैरसोयींचा शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सामना करण्याची नामुष्कीची वेळ आली होती.
नगरपालिकेचे अभियंता राजेश तडवी यांनी देखील आज गुरुवार (३ ) जुलै रोजी नऊ नंबर शाळेला भेट देऊन गैरसोयीची पाहणी केली आणि शाळेच्या मुख्याध्यापकांकडून आढावा घेतला. शिवमंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरु असल्याने दगडाचे आणि मातीचे ढिगारे शाळेच्या आवारात पडून आहेत.
एप्रिल आणि मे महिन्यात शाळेला उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर वास्तविक शाळा आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आणि चिखलातून वाट काढत जूनमध्ये शाळेत येण्याची वेळ आली होती.
शाळेच्या दुरवस्थेबाबतचे वृत्त ठाणेवैभवमध्ये प्रसिद्ध होताच शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी जयश्री धायगुडे यांनी शाळेला भेट देऊन शाळेच्या दुरवस्थेची पाहणी केली. शाळेच्या नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत जुन्या इमारतीची नगरपालिकेच्या बांधकाम खात्यामार्फत दुरुस्ती करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही असे निवेदन मुंबईच्या शिक्षण उप संचालकांना देण्यात आल्याचे प्रशासनाधिकारी धायगुडे यांनी सांगितले.
पावसाळ्यात शाळेला भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सुविधा देण्यात येतील. शिवगंगानगरमध्ये शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे, इमारतीचे बांधकाम देखील येत्या काही महिन्यात पूर्ण केले जाईल, अशी माहिती नगरपालिकेचे अभियंता राजेश तडवी यांनी दिली.
पालिकेच्याच १२ नंबर शाळेत देखील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी स्वच्छतागृह अशा अनेक गैरसोयी भेडसावत असून त्या दूर करण्याची मागणी शाळेतर्फे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
300x450
300x600