कल्याण : कोणार्क एक्स्प्रेसने तामिळनाडूला प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन लाख ४० हजार रुपये किमतीची सोनसाखळी कल्याण रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून लंपास करण्यात आली. रविवारी घडलेल्या या प्रकाराची सोमवारी रेल्वे हेल्पलाइन १३९ वर तक्रार करण्यात आली. त्यानंतर कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मालतीदेवी नंद ममगाई या आपल्या नातेवाईकांसोबत कोणार्क एक्स्प्रेसने तामिळनाडूला जात होत्या. ट्रेन कल्याण स्थानकात दाखल झाल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. घटनेनंतर मालतीदेवी यांनी रेल्वे हेल्पलाइन १३९ वर तक्रार नोंदवली. त्यानुसार सोमवारी कल्याण रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.