शिवसेनेचे शिवराम पाटील यांची महासभेत माहिती
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत लोकप्रतिनिधी, स्थायी समिती गठीत होऊन सात महिने उलटले तरी या कालावधीत नगरसेवक आणि नगरसेवकांनी विकासकामांचे अनेक प्रस्ताव दर महासभेत मांडले आहेत. मात्र, आतापर्यंत मांडलेल्या १८३० प्रस्तावांपैकी अवघे एकही प्रस्ताव मंजूर झाला नसून आयुक्तांच्या प्रशासकीय कालावधीतील १८५ प्रस्ताव (मंजूर झालेले) आल्याची माहिती शिवसेनेचे नगररसेवक शिवराम पाटील यांनी शुक्रवारी (ता.१८) झालेल्या महासभेत देत खळबळ उडवून दिली आहे.
नगरसेवकांच्या प्रस्तावांना मंजूर मिळत नसेल तर वर्षभरामध्ये आम्ही कुठल्याही कामाची अपेक्षा करू नये का? असा प्रश्न नगरसेवक शिवराम पाटील पाटील सत्ताधारी आणि महापौर सुजाता पाटील यांना विचारला आहे. पालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी आणि विरोधी पक्षातील शिवसेना शिंदे गट, मनसे अणि ठाकरे गटाचे लोकप्रतिनिधी देखील सात महिन्यात प्रभागात एकाही विकास कामाचा श्री गणेशा न झाल्याने तदर्थ समितीमुळे हतबल झाल्याची चर्चा आहेत.
पाच वर्षाच्या प्रशासकीय कालावधीनंतर नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूका आठ महिन्यापुर्वी झाल्या. निवडणुकीनंतर ५ फेब्रुवारी रोजी भाजपचे महापौर, उपमहापौर विराजमान झाले. स्थायी समिती गठीत झाली. तर २० फेब्रुवारी रोजी झालेल्या महिल्या सर्व साधारण सभेत सभागृह नेता, विरोधी पक्षनेता, स्वीकृत नगरसेवकांची निवड प्रक्रिया पार पडली.त्यानंतर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून नवी मुंबईचा कारभार सुरु झाला. माजी महापौर तथा सत्ताधारी भाजपचे सभागृह नेते सागर नाईक यांनी पाच वर्षांच्या प्रशासक राजवटीच्या कार्यकाळात झालेल्या कामांची आणि कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी आणि विविध विभागांच्या देखरेखीसाठी प्रथमच नवीन तदर्थ समित्यांची स्थापना केली. मात्र, या तदर्थ समितीकडून लोकप्रतिनिधींकडून मांडण्यात आलेल्या विकासकामांना मंजूरी मिळत नसल्याची ओरड राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरु असतानाच सात महिन्यानंतर शुक्रवार १८ सप्टेंबर रोजी झालेल्या महासभेत शिवसेनेचे शिवराम पाटील यांनी माजी महापौर जयवंत सुतार यांनी मांडलेल्या इतिवृत्तांताच्या विषयावर चर्चा करताना नगरसेवकांनी मांडलेल्या किती प्रस्तावांना तदर्थ समितीकडून ब्रेक लावण्यात आला याची आकडेवारी महासभेत मांडली.
१११ नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी आस्थेने या ठिकाणी प्रस्ताव मांडले आहेत. आणि बर्याचशा सूचना, हरकती या सभागृहामध्ये प्रत्येकाच्या निवेदनातून आलेल्या आहेत. त्यांचं इतिवृत्त येणं हे तितकंच महत्त्वाची बाब आहे. आतापर्यंत महासभेकडे सदस्यांचे प्रस्ताव साधारण १८३० प्रस्ताव आलेले आहेत. त्यापैकी तदर्थ समितीकडे पाठवलेले प्रस्ताव साधारण १०९८ आहेत. तदर्थ समितीकडून महासभेपुढे आलेले प्रस्ताव फक्त २१३ आहेत. प्रशासकीय काळातील मंजूर आयुक्तांकडील आतापर्यंत १८५ प्रस्ताव आल्याची वस्तूस्थिती सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. सभागृहाने तर निर्णय घेतलेला आहे की तदर्थ समितीकडे आल्यानंतर पुन्हा महासभेकडे. आणि पुन्हा महासभेकडे पुन्हा २ महिने जाणार. म्हणजे इतक्या वर्षभरामध्ये आम्ही कुठल्याही कामाची अपेक्षा करू नये का?, अशी विचारणा करीत शिवसेनेचे नगरसेवक शिवराम पाटील यांनी संताप व्यक्त केला.