जिल्हा
कोकणातील हापूसच्या २४ पेट्या एपीएमसीत दाखल
कोकणातील हापूसच्या २४ पेट्या एपीएमसीत दाखल
फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: हवामान बदलामुळे कोकणातील हापूस हंगामाला उशिराने सुरुवात होणार असली तरी वाशीच्या एपीएमसी बाजारात सोमवारी कोकणातील हापूस आंब्याच्या २४ पेट्या दाखल झाल्या. त्यामुळे हापूस आवक होण्यास सुरुवात झाल्याने या आंब्यांची विधिवत पूजा करून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले. ४ ते ६ डझन पेटीला १० हजार ते १५ हजार रुपये भाव मिळाला.
यंदा हापुसचे उत्पादन चांगले असेल, मात्र हवामान बदलामुळे हंगामाला उशिराने सुरुवात होणार असून १५ मार्चनंतर मोठ्या प्रमाणात आवक वाढेल, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात हापूस दाखल होण्यास सुरुवात होते, तर डिसेंबरमध्ये तुरळक पेट्या दाखल होण्यास सुरुवात होत असते. मात्र यंदा हवामान बदलाने हापूसच्या उत्पादनाला फटका बसला. फळधारणा सुरू असलेल्या आंब्याचे नुकसान झाले होते. हापूसला मोहोर फुटण्याची वेळ आणि हवामान बदल, परतीचा पाऊस तसेच कडाक्याची थंडी त्यामुळे अतिमोहोर फुटला त्यामुळे बहुतांश ठिकाणी फळधारणा झाली नाही. तर थ्रिप्स रोगामुळे देखील मोहर गळून गेला. त्यामुळे सुरुवातीच्या उत्पादनाला फटका बसला. आता पुन्हा नव्याने मोहोर फुटला असून हवामानावर उत्पादन अवलंबून आहे, अशी माहिती हापूस शेतकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे यंदा हापुसची आवक चांगली आवक होणार असून हंगामाला मात्र विलंब होणार आहे. मार्च महिन्यात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे खवय्यांना हापूस आंब्याची चव चाखण्यासाठी मार्चपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
300x450
300x600