चेना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

भाईंदर: मीरा-भाईंदरमधील तीन तरुण पावसाचा आनंद घेण्यासाठी काशिमीराच्या चेना नदीकाठी गेले होते. या तिघांना पाण्यात जाण्याचा मोह आवरता आला नाही. पाण्याचा अंदाज न आल्याने यातील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

काशिमीरामधील चेना नदी परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांपैकी एकाचा पोहत असताना बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी सुमारास घडली. ही घटना जवळपास दुपारी ३ वाजता घडली असून मृत युवक प्रणय पळसकर हा अंधेरी येथील रहिवासी होता, तर त्याचे दोघे मित्र भाईंदर येथील असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिघे मित्र चेना नदीच्या परिसरात पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी प्रणयने नदीत उतरण्याचा प्रयत्न केला असता तो खोल पाण्यात गेला आणि बुडाला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत उशीर झाला होता.

घटनेची माहिती मिळताच काशीगाव पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे.