विधान परिषदेसाठी ठाणे-कोकणातून उमेदवारी
ठाणे : शिवसेना शिंदे गटाचा प्रभाव असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजपाची निर्विवाद ताकद उभी करण्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने ठाणे आणि कोकणातील उमेदवारांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रभावक्षेत्रातच आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. म्हणूनच ठाण्यातून माधवी नाईक तर कोकणातून प्रमोद जठार या दोन शिलेदारांचा पाच जणांच्या उमेदवारी यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ठाण्यातून आणखी एक भाजप आमदार विधान परिषदेवर जाणार असून आमदारांची संख्या तीनवर पोहचणार आहे. शिवसेना शिंदे गट आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी हे आव्हान समजले जात आहे. ठाणे आणि कोकण शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला आहे. या ठिकाणी भाजपने स्वतंत्र ताकद उभी करण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र आहे. ठाण्यातील अॅड. माधवी नाईक यांना संधी देत भाजपने स्थानिक पातळीवर नवे समीकरण मांडले आहे.
कोकणात प्रमोद जठार यांची निवडही तितकीच बोलकी ठरते. सिंधुदुर्गातील राजकीय घडामोडींमध्ये अलीकडेच निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भाजपने हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांच्याशी सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जठार यांची एंट्री ही राजकीय संदेश मानण्यास हरकत नाही. ठाणे शहरातील विधानसभेचे आमदार संजय केळकर हे सध्या भाजपाची जनमानसात प्रतिमा उंचावण्याचे काम करत असून शिंदे गटाला उघड उघड आव्हान देत आहेत. आमदार अॅड. निरंजन डावखरे आणि आत्ता अॅड. माधवी नाईक हे दोन भाजपचे शिलेदार देखिल सेनेविरोधात आक्रमक भूमिका बजावण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. २०२९मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपाची ही स्वबळाची रणनीती असल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील इतर तीन उमेदवारांच्या निवडीनंतर विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या प्रभावक्षेत्रातच आपले उमेदवार देत भाजपने भविष्यातील राजकीय समीकरणांची बीजे पेरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आगामी काळात ही निवडणूक केवळ विधान परिषदेपुरती मर्यादित न राहता महायुतीतील अंतर्गत शक्ती-संतुलनावरही परिणाम करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.