शहापूर: मुंबई-नाशिक महामार्गावरील खर्डी वनपरिक्षेत्रात लागवड केलेली रान आवळ्यांची रोपे मोठी होत आहेत. कागदोपत्री झाडांच्या देखभालीसाठी खर्च दाखवण्यात येत असला तरी वनविभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असून वणव्यांमुळे ही झाडे जळून नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे.
आवळ्याचे झाड चढायला कठीण, बारीक खोडाचे असते आणि फळे उंच फांद्यावर लागतात. त्यामुळे ही फळे मिळवण्यासाठी आवळ्याच्या फांद्या छाटतात किंवा वृक्षच तोडतात, जंगलाला लागणारे किंवा बहुतांश वेळेस कृत्रिमरित्या लावण्यात येणारे वणवे अशा अनेक वृक्षांच्या अंताचे कारण ठरत आहेत.
शहापूर वनविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या खर्डी वनपरीक्षेत्रात मुंबई-नाशिक महामार्गालागत असलेल्या दर्गा टेकडीवर वनविभागाने शेकडो रानआवळ्याची रोपे लावली असून त्या रोपांचे रूपांतर हळूहळू मोठ्या वृक्षात होताना दिसत आहे, परंतु खर्डी वनपरीक्षेत्राचे या आवळा लागवडीकडे पूर्णतः दुर्लक्ष होतांना दिसत आहे. झाडांच्या बाजूला असलेले गवत काढलेले नाही, त्यांना मातीची भर देण्यात आलेली नाही, या झाडांच्या देखभाल दुरुस्तीचा संपूर्ण खर्च शासन कागदोपत्री करत असतांना प्रत्यक्षात जागेवर असलेली झाडं मात्र वनव्यामुळे जळून जात आहेत. वनविभागाने याकडे लक्ष दिल्यास रान आवळ्याचे संवर्धन तर होईलच शिवाय निसर्गप्रेमी पर्यटकांना या ठिकाणी भेट देऊन आवळ्याची माहिती मिळेल, त्यापासून निर्मित होणाऱ्या विविध प्रोडक्टची विक्री देखील करता येईल. परिणामी वनविभागाला आर्थिक फायदा होईल.
आयुर्वेदाने आवळ्याला अमृतफळ मानले आहे. आरोग्यसंपन्न होण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या च्यवनप्राशसारख्या औषधात मुख्य घटक आवळाच असतो. अनेक आजारांवर व अकाली वृद्धत्व न येण्यासाठी आवळा प्रसिद्ध आहे. पण, मागील काही वर्षांत जंगलातील आवळ्याची झाडेच कमी झाली आहेत. जी दिसतात त्यांना आवळे लागलेले दिसत नाहीत. मध्यंतरी संकरित आवळ्याची अनेक ठिकाणी लागवड झाली. त्यामुळे मोठ्या आकाराचे हे आवळे बाजारात दिसत असल्याने कुणालाही खऱ्या गावरान आवळ्याची आठवण राहिली नाही.
गुणकारी आवळ्याचे फायदे
थंडीच्या मौसमात आवळा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. आकाराने लहान असलेला गुणकारी आवळा हा चवीला तुरट आंबट असला तरी त्याचे शरीराला होणारे फायदे मात्र अनेक आहेत. आवळ्यापासून मोरावळा, पेठा, सुपारी, सरबत, लोणचं, आवळा पावडर, आवळा कॅण्डी असे अनेक पदार्थ तयार केले जातात. पित्तापासून ते हाडांच्या मजबुतीपर्यंत विविध पद्धतीने आवळ्याचे शरीरासाठी फायदे होतात. आवळ्याच्या सेवनाने मेंदू पुष्ट, श्वासरोग दूर व हृदय मजबूत होते. नेत्रदृष्टी आणि आतड्यांच्या कार्यशक्तीत वृद्धी होते. आवळ्यामध्ये सी व्हिटॅमिन असते.