कोट्यवधी रुपयांच्या कामांची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
ठाणे : रायला देवी तलाव आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी मागील सात-आठ वर्षांत ठाणे महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र, आजही तलावाची दुरवस्था कायम असल्याने हा निधी नेमका कुठे खर्च झाला, असा सवाल समाजसेवक व स्थानिक नागरिक नरेंद्र (रवी) हिवराळे यांनी उपस्थित केला आहे.
या कामांमध्ये झालेल्या कथित अनियमिततेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (ACB) चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हिवराळे यांनी सांगितले की, २०१९ मध्ये तलाव व परिसराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे साडेदहा कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती. त्यामध्ये तलावाची खोली वाढवणे आणि संरक्षक भिंत उभारणे अपेक्षित होते. मात्र, न्यायालयाच्या निर्देशानंतर सिमेंट काँक्रीटच्या भिंतीऐवजी गॅबियन वॉल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तलावाची रुंदी कमी करून केवळ अडीच बाजूंना गॅबियन वॉल उभारण्यात आली.
तलावाची खोली वाढवण्यासाठी मोठ्या पंपांच्या साहाय्याने पाण्याचा उपसा करण्यात आला. मात्र, या प्रक्रियेदरम्यान आवश्यक खबरदारी न घेतल्याने तलावातील जलचर तसेच भारतीय प्रजातीची कासवे मृत्युमुखी पडल्याचा आरोपही त्यांनी केला. एवढा खर्च होऊनही तलावाची खोली प्रत्यक्षात किती वाढवण्यात आली, याबाबत प्रश्नचिन्ह असल्याचे त्यांनी नमूद केले.
तलाव परिसरात कोणत्याही प्रकारचे पक्के बांधकाम करू नये, असे स्पष्ट निर्देश असतानाही सुशोभीकरणाच्या नावाखाली अर्धवट बांधकाम करण्यात आले असून त्यावरही कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचा आरोप हिवराळे यांनी केला. अर्धवट कामांमुळे तलावाच्या उत्तर बाजूस रानटी झुडपे वाढली असून त्या ठिकाणी प्रेमीयुगुलांचा वावर वाढल्याचेही त्यांनी सांगितले.
पश्चिमेकडील बाजूस छठपूजेसाठी तात्पुरते जलकुंड तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या विटा व भुसा आजही हटवण्यात आलेल्या नाही. तसेच, तलावाच्या सुरक्षेसाठी केवळ एकच सुरक्षा चौकी उभारण्यात आली असून एवढ्या मोठ्या परिसरासाठी किमान पाच ते सहा सुरक्षा चौक्यांची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हिवराळे यांनी दावा केला की, अमृत योजनेअंतर्गत मिळालेले सुमारे चार कोटी रुपये, तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निधीतून झालेल्या कामांसह एकूण खर्चाची स्वतंत्र चौकशी व्हावी. नागपूरच्या कंत्राटदारामार्फत झालेल्या कामांमध्ये खर्च झालेला निधी नेमका कुठे गेला, याचा तपास करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
मागील आठ वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही रायला देवी तलाव आणि परिसर अद्याप सर्वसामान्य नागरिकांसाठी पूर्णपणे विकसित व खुला झालेला नसल्याबद्दलही हिवराळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.