ठाणे: नौपाडा प्रभाग समितीच्या कार्यालयाच्या तळाशी असलेल्या गावदेवी भाजी मंडईमधील कपड्याच्या दुकानांना लागलेल्या आगीत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यासह एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले. प्रशासकीय यंत्रणेने हे बळी घेतल्याची चर्चा ठाणे शहरात सुरु झाली आहे. मध्यरात्रीचा अंधार आणि धुराचे लोट यात शिरून अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
गावदेवी भाजी मंडईमध्ये १५५ भाजीचे ओटले आहेत, परंतु सुमारे शंभर भाजी विक्रेत्यांनी हे ओटले तयार कपडे विकणाऱ्यांना भाड्याने दिले आहेत. कपड्यांच्या दुकानांनी संपूर्ण भाजी मंडई व्यापून गेली आहे. आज पहाटे २.४३च्या दरम्यान या भाजी मंडईमधील वीज मीटरच्या पेटीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची शक्यता असून कपड्याच्या दुकानामुळे या आगीने उग्ररूप धारण केले होते.
अग्निशमन दलाला याबाबत स्थानिक नगरसेवक संजय वाघुले यांनी माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत असतानाच नौपाडा प्रभाग समितीमधील रात्रपाळीचे सुरक्षारक्षक काळुराम गाडेकर हे पहिल्या माळ्यावर असल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. या ठिकाणी असलेला बाहेर पडण्याचा रस्ता दुय्यम निबंध विभागाच्या बाजूने बंद करण्यात आल्याने त्या बाजूने बाहेर जाता आले नाही. सुरक्षा रक्षक पहिल्या माळ्यावर असल्याने त्यांना बाहेर पडता येत नव्हते. त्यांना सुरक्षित बाहेर आणण्यासाठी मुल्ला नामक जवान हे आधी गेले होते, परंतु ते काहीच प्रतिसाद देत नसल्याने सुट्टी असतानाही गंभीर घटना घडल्यामुळे कामावर आलेले स्थानक अधिकारी सागर शिंदे, जवान समीर जाधव हे सुरक्षा रक्षकाला वाचवण्यासाठी पहिल्या मजल्यावर गेले होते. भालेराव आणि इतर जवान पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी असलेल्या शिडीजवळ आगीवर नियंत्रण मिळवत् होते. हे तीनही जवान काही काळ मोबाईलवर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. पहिल्या मजल्यावर धुराचा लोट होता. संपूर्ण नौपाडा प्रभाग समिती कार्यालयात धूर पसरला होता. या दुर्घटनेत प्लास्टिक चपला जळाल्याचा उग्र वास येत होता. अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि जवानांकडे ऑक्सिजन मास्क होते, परंतु ऑक्सिजन संपल्याने अलार्म वाजला. त्यामुळे हे सर्व जण खाली यायला निघाले. परंतु धुरामुळे त्यांना रस्ता दिसत नव्हता.
पाष्टे आणि सागर जाधव या जवानांना सागर शिंदे आढळून न आल्याने ते इमारतीच्या वरच्या भागात गेले. त्यावेळी टेबलजवळ अधिकारी सागर शिंदे हे निपचित पडलेले आढळून आले. त्यांना काढण्यासाठी जवानांनी त्यांना दोरी बांधली, परंतु ती दोरी सुटली. त्यानंतर जवानांनी अथक प्रयत्नाने त्यांना बाहेर काढले, मात्र शिंदे यांना वीर मरण आले होते. सुरक्षारक्षक गाडेकर हे देखील टेबलजवळ मृत्यूमुखी पडल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांना नजरेस पडले.
अधिकारी सागर शिंदे आणि सुरक्षारक्षक गाडेकर हे दोघे टेबलाजवळ निपचित पडल्याचे आढळून आल्यानंतर त्यांना जवानांनी खाली आणले. त्यावेळी ते मृत्यू पावल्याचे स्पष्ट झाले. त्यांचे मृतदेह कळवा येथिल छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आले. सुरक्षा रक्षकाचा मृतदेह गावी अंत्यविधीकरिता पाठविण्यात आला तर सागर शिंदे यांना अग्निशमन केंद्र येथे मानवंदना देण्यात आली. त्यावेळी त्यांच्या आईने आणि पत्नीने हंबरडा फोडल्याने उपस्थित सर्वांचे मन हेलावून गेले. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर,आमदार जितेंद्र आव्हाड, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, महापालिका आयुक्त सौरभ राव, एमएमआरडी हद्दीतील अग्निशमन अधिकाऱ्यांनी या वीर जवानाला मानवंदना दिली.