ओल्या कचऱ्याची विल्हेवाट; खतनिर्मितीची मोकळी वाट

* गायमुख भागात लवकरच १०० मेट्रीक टन प्रकल्प कार्यान्वित
* नागला बंदर, डायघर आणि आतकोली येथे टप्प्याटप्प्याने प्रकल्प

ठाणे: ठाण्यात निर्माण होणाऱ्या हजारो टन ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठाणे महापालिका सज्ज होऊ लागली असून लवकरच गायमुख येथे १०० मेट्रिक टन ओल्या खचऱ्यापासून खतनिर्मिती करणारा प्रकल्प कार्यान्वित होणार असून त्यानंतर नागला बंदर, डायघर आणि आतकोली येथे टप्याटप्याने प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत.

ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला ११०० मेट्रीक टन कचऱ्याची निर्मिती होत आहे. यात ओल्या कचऱ्याचे प्रमाण सुमारे ६० टक्के एवढे आहे. तर ४० टक्के सुका कचरा आहे. परंतु कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यात पालिकेला अद्याप फारसे यश आलेले नाही. परंतु सद्यस्थितीत हिरानंदानी इस्टेट, कोलशेत आणि साकेत या भागात ८० आणि कौसा येथे १० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. परंतु उर्वरीत कचऱ्याचा प्रश्न अद्याप सुटु शकलेला नाही.

महापालिका सध्या भिवंडी येथील आतकोली भागात शहरातील कचरा टाकत आहे. भविष्यात सुरु होणाऱ्या वीज आणि कोळसानिर्मिती प्रकल्पापूर्वी याठिकाणी दररोज ६०० मेट्रीक टन क्षमतेचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यासाठी पुढील १० वर्षांसाठीची निविदा काढण्यात आली होती. त्यानंतर आता याचे कार्यादेश देण्यात आले असून कामाला देखील सुरवात झाल्याची माहिती महापालिकेने दिली. यासाठी ६७ कोटींचा खर्च केला जात आहे. याठिकाणी ६०० मेट्रीक टन कचऱ्याचे वर्गीकरण केले जाणार आहे. त्यानुसार याचा प्लान्ट उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी सुमारे पाच ते सहा महिन्यांचा कालावधी जाणार आहे. या घनकचरापूर्व प्रक्रिया प्रकल्पातून प्लास्टीक व इतर वस्तु वेगळ्या केल्या जाणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्यात कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया केली जाणार असून त्यापासून वीज निर्मिती केली जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.

घोडबंदर भागातील गायमुख येथील जकात नाक्याच्या जागेवर कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प आकार घेत आहे. प्रकल्प उभारणीसाठी शासनाकडून ५० कोटींचा निधी मंजुर झाला असून प्रत्यक्षात कामालाही सुरवात झाली आहे. गायमुख जकात नाका परिसराचे एकूण क्षेत्रफळ ४८०० चौ.मी इतके असून त्यापैकी ४१८० चौ.मी जागेवर कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याठिकाणी ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचे नियोजन आहे. घोडबंदर भागातील गृहसंकुले आणि येथील रहिवाशांकडून ओला आणि सुका कचरा वेगळा करुन घेतला जाणार आहे. तसेच महापालिकेच्या माध्यमातून देखील तशाच पध्दतीने त्या कचऱ्याची वाहतुक करणार आहे. शिवाय ओला कचरा रोजच्या रोज व सुका कचरा आठवड्यातून दोन ते तीन दिवस उचलला जाणार आहे.

याशिवाय नागला बंदर येथे देखील १०० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. डायघर येथे महापालिका सद्यस्थितीत कचरा टाकत नसली तरी देखील या ठिकाणी महापालिका आता ३०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणार आहे. या ठिकाणी ब्रिक्स तयार केले जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.