निळ्या सिलेंडरचा काळा बाजार

* हॉटेल व्यावसायिकांचा आरोप
* वितरकांवर छापे टाकण्याची मागणी

ठाणे: आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा गैरफायदा घेऊन काही टोळ्या अठराशे रुपयांना मिळणारा व्यावसायिक गॅस काळ्या बाजारात चार ते पाच हजार रूपयांना विक्री करत असल्याचा आरोप ठाण्यातील हॉटेल व्यवसायिकानी केला आहे. तर तत्काळ गरज असलेल्या घरगुती गॅस सिलेंडरसाठी वितरण करणारे कर्मचारी दोन हजार रुपयांची मागणी करत असल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत.

ठाणे हॉटेल असोसिएशन या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या व्यथा मांडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महिना पुरेल इतका गॅस उपलब्ध असल्याचे सांगितले असले तरी काळ्या बाजारात दुप्पट पैसे घेऊन गॅस सिलेंडरची विक्री केली तर गॅस शिल्लक राहणार नाही, अशी भीती व्यक्त केली. ठाण्यातील ३० टक्के हॉटेल व्यवसायिकांकडे पाईपलाईन गॅस आहे. उर्वरित ७० टक्के हॉटेल व्यावसायिक वाणिज्य गॅस सिलेंडरचा वापर करतात. काळ्या बाजारातील विक्रीवर सरकारने नियंत्रण आणले नाही तर रविवारपर्यंत ठाण्यातील बहुतेक हॉटेल बंद पडतील,अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली.

आखाती युद्ध असेच सुरु राहिले तर ठाणे-मुंबई भागात इतर प्रांतातून आलेले पर्यटक, व्यावसायिक, आयटी कर्मचारी, कामगार यांच्यावर उपासमारीची पाळी येईल, अशी शक्यता व्यक्त केली. राज्य सरकारने तातडीने काळ्या बाजारात गॅस सिलेंडरची विक्री करणाऱ्यांच्या गोडाऊन फिलिंग सेंटरवर छापा मारून काळ्या बाजारातील विक्री बंद करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले.

ठाणे महापालिकेचे माजी मुख्य अग्निशमन अधिकारी श्री.काळे यांनी हॉटेल व्यावसायिकांना पाईप लाईनने गॅस पुरवठा करण्यास विरोध केला होता. त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नाही, त्याची शिक्षा आता मिळत आहे. विद्यमान मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. झळके यांनी आत्तापर्यंत ३० टक्के हॉटेल व्यवसायिकांना पाईप लाईनने गॅस पुरवठा करण्यासाठी परवानगी दिली, त्यामुळे ३० टक्के हॉटेल तरी सुरु राहतील, असा विश्वास उपाध्यक्ष रत्नाकर शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केला. ठाणे शहरात १२०० हॉटेल असून छोटे-मोठे व्यावसायिक यांची संख्या धरल्यास ती पाच हजारपेक्षा जास्त होईल. तसेच वडापाव विक्री करणाऱ्या टपऱ्या देखिल काही दिवसात बंद पडतील असे देखिल यावेळी सांगण्यात आले.

यावेळी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष उमेश शेट्टी, उपाध्यक्ष रत्नाकर शेट्टी, सचिव रघुनाथ रॉय, खजिनदार प्रशांत शेट्टी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.