प्रभाग रचनेचा आराखडा; आज सुनावणी की आखाडा?

सर्वाधिक हरकती कोलशेत, दिवा, घोडबंदर भागातून

ठाणे: आगामी ठाणे महापालिका निवडणुकीकरिता तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचना आराखड्यावर २७० नागरिकांनी हरकती घेतल्या असून उद्या महापालिकेत यावर सुनावणी घेण्यात येणार आहे. या हरकती आणि सूचनांची दखल महापालिका कशी घेणार, याकडे पक्ष कार्यकर्त्यांचे विशेषतः विरोधकांचे लक्ष लागले आहे. या सूचना आणि हरकतींचा निकाल लावल्यानंतरच आराखडा अंतिम करण्यात येणार आहे.

तब्बल तीन वर्षानंतर महापालिकेची निवडणूक येऊ घातली आहे. १३१ नगरसेवक असलेल्या महापालिकेत चार नगरसेवक असलेले ३२ आणि तीन नगरसेवक असलेला एक असे ३३ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. घोडबंदर भागातून या प्रभागाची सुरुवात करून दिवा-मुंब्रा येथे त्याचा शेवट करण्यात आला आहे. या आराखड्यावर २७० नागरिकांनी हरकत घेतली आहे. सर्वाधिक हरकती कोलशेत, दिवा आणि घोडबंदर भागातील आहेत. सत्ताधारी पक्षाने त्यांच्या सोयीकरिता त्यांना फायदा होईल अशी प्रभाग रचना तयार केली असल्याची आरोप करण्यात आला आहे. योग्य सीमांकन झालेले नसून एका प्रभागाचे दोन प्रभाग करताना सत्ताधारी पक्षाच्या इच्छुक उमेदवाराला समोर ठेऊन ही प्रभाग रचना केली असल्याचा आरोप विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधीनी केला आहे.

ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजय सेठी यांच्यासमोर उद्या सकाळी १० पासून ठाणे महापालिकेच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या कै.नरेंद्र बल्लाळ सभागृहात ही सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यावर उद्या हरकत घेणाऱ्या ठाणेकरांना बोलाविण्यात आले आहे.

प्रभाग रचना तयार करण्याचे काम प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी करतात. त्यामध्ये सत्ताधारी पक्षातील कोणीही हस्तक्षेप केलेला नाही. २०१७ साली जी प्रभाग रचना होती, त्यामध्ये अगदी किरकोळ बदल करून ही पारदर्शक प्रभाग रचना केली असल्याचा दावा महापालिकेतील एका अधिकाऱ्याने केला आहे, त्यामुळे उद्या प्रभाग रचनेवर सुनावणी झाल्यानंतर काय बदल होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.