वचननामा प्रकाशन सोहळ्यात संजय राऊत यांचे आवाहन
ठाणे: ठाण्याच्या रस्त्यावर ठेकेदारांनी हैदोस घातला असून तलावांचे शहर, सांस्कृतिक शहर असलेले ठाणे बकाल झाले आहे. हे चित्र बदलायचे असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी ठाणेकरांना केले.
महाविकास आघाडीचा वचननामा आज खा. संजय राऊत, माजी खा. राजन विचारे, मनसे नेते अविनाश जाधव, अभिजित पानसे ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला. मात्र या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एकही नेता उपस्थित नव्हता.
ठाण्यातील वाहतूक कोंडीबाबत बोलताना खा. श्री. राऊत म्हणाले कि ठाणे हे सुसंस्कृत शहर होते, ते ठेकेदारांमुळे बकाल झाले. ठाण्यात ते चित्र बदलायचे आहे. ठाण्याची पाणीसमस्या दूर करण्यासाठी स्वतंत्र धरण देऊन ठाण्याची टँकर माफियांच्या तावडीतून सुटका करणार आहोत. ठाणेकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी योजना, वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी ज्या रस्त्यांची कामे सुरु आहेत त्याला गती देणार. पार्किंग प्लाझा तयार करणार अशी आश्वासने या वचननाम्यात देण्यात आली आहेत.
यावेळी खा. श्री. राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ठाणे लुटले कोणी? ठाण्यात टेंडर संस्कृती आणली कोणी? असा सवाल करून ठाण्यात ठेकेदारांनी हैदोस घातला आहे. त्यांच्यामुळे दर्जेदार रस्ते आणि इतर सुविधा मिळत नाहीत, असे देखील श्री. राऊत म्हणाले. ठाणे हे तलावांचे आणि सुसंस्कृत शहर होते, ही ओळख पुसली गेली असून आता हे शहर ड्रग्सचे शहर बनले आहे. पानटपरी, शाळा-कॉलेजजवळ खुलेआम ड्रग्सविक्री केली जात असल्याचा आरोप खा. श्री. राऊत यांनी केला.
ठाण्यात मराठी माणसं एकत्र आली आहेत. त्यांची घट्ट एकी झाली आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता येईल, असा विश्वास खा. श्री. राऊत यांनी व्यक्त केला. शिवसेनेची ठाण्यावर सत्ता आली तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजकारणात देखील नव्हते, त्यामुळे ठाणे हे आनंद दिघे यांचे आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे ठाण्यावर प्रेम होते असे देखील श्री. राऊत म्हणाले. सत्ताधारी पक्षाने मागिल वेळी जो जाहीरनामा ठाणेकरांना दिला होता त्यापैकी सात टक्के देखील आश्वासने पूर्ण केली नाहीत, असा आरोप राजन विचारे यांनी केला.