ठाण्यात बिनविरोध पॅटर्नची ६८ वर्षांनी झाली पुनरावृत्ती!

ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या २०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची घटना घडल्यानंतर ६८ वर्षांपूर्वीच्या घटनेला पुन्हा उजाळा मिळाला आहे. त्यावेळी पालिकेच्या निवडणुकीत देखील संयुक्त महाराष्ट्र समितीचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.

सध्या सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीत राज्यात जवळपास ७० उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात महायुतीच्या कल्याण-डोंबिवलीतील २०, भिवंडीतील सहा आणि ठाणे महापालिकेतील सहा उमेदवारांचा समावेश आहे. या बिनविरोध पॅटर्नमुळे राजकीय वर्तुळात एकच हलकल्लोळ उडाला असून न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी विरोधी पक्षांनी केली आहे. ठाण्यात हा मुद्दा गाजत असताना अशाच पद्धतीची घटना ६८ वर्षांपूर्वी घडल्याचे समोर आले आहे.

१९५७ साली ठाणे नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. त्यावेळी रिटर्निंग ऑफिसर तथा ठाणे तालुक्याचे मामलेदार यांच्याकडे ६९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या अर्जांच्या छाननीत काहींनी एकाच वॉर्डांत दोन-तीन अर्ज भरल्याचे आढळून आले तर काहींनी दोन वॉर्डातून अर्ज भरले होते. संयुक्त महाराष्ट्र समितीने सर्वांच्या सर्व ३४ जागांसाठी उमेदवार दिले होते. त्यातील एक उमेदवार श्रावण पवार यांचा अर्ज बाद झाला. उर्वरित ३३ उमेदवारांपैकी समितीचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले.

वॉर्ड क्र. २ मधून ग. मो. कोळी, य. द. उर्फ नानासाहेब सुळे आणि क. के. पावसकर, वॉर्ड क्र. ३ मधून महिला राखीव गटातून ताराबाई वैद्य तसेच वॉर्ड क्र. ४ मधून आशा वाघोलीकर आणि वकील भि. गं. ओक असे एकूण सहा जण बिनविरोध निवडून आले होते. ६८ वर्षांनी या घटनेची ठाणे महापालिका निवडणुकीत पुनरावृत्ती झाली आहे. त्यावेळी एकाच पक्षाचे सहा उमेदवार बिनविरोध झाल्यानंतर वाद झाल्याचे ऐकिवात नाही, पण यावेळी महायुतीच्या बिनविरोध पॅटर्न विरोधात मात्र जोरदार आक्रमक भूमिका विरोधकांनी घेतली आहे.