बेकायदा नळ जोडण्यांप्रकरणी कारवाईचे अस्त्र
ठाणे: बेकायदा नळजोडण्यांमुळे मुंब्रा दिव्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत असताना महापालिकेचेही आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर या भागात काही दिवसांपूर्वी मोहीम हाती घेऊन नळ जोडण्या खंडित करण्याची कारवाई हाती घेण्यात आली होती. मात्र आता या प्रकरणी व्हॉल्वमनपासून कार्यकारी अभियंत्यांना दोषी धरण्यात येणार असून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
पाणीपट्टी वसुलीसाठी ठाणे महापालिकेने काही महिन्यांपासून धडक मोहिम उघडली आहे. यावेळी मुंब्रा, दिवा प्रभागात बेकायदा नळ जोडण्यांनी रोज लाखो लीटर पाण्याची चोरी होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यासाठी एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात पालिकेने या प्रभागांमध्ये मोर्चा वळवत अनधिकृत नळजोडण्या तोडण्यास सुरुवात केली. यासाठी पालिकेने विभागनिहाय पथक तयार करून पहिल्या दिवशी २९, दुसर्या दिवशी ४४ तर तिसर्या दिवशी ५७ अनधिकृत नळजोडण्या पालिकेने तोडल्या. त्याचबरोबर अनधिकृत आरओ प्रकल्प, पाणी साठे आणि टँकर भरणा केंद्रांवरही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोन गुन्हेही दाखल करण्यात आले.
या पाणीचोरीमध्ये भुमाफीया, बेकायदा इमले उभारणारे ‘विकासक’ यांचा मोठा हात असला तरी पालिकेच्या कर्मचार्यांच्या अर्थपूर्ण सहकार्यामुळेच हे प्रकार घडत असल्याचे या कारवाईदरम्यान समोर आले आहे. याची गंभीर दखल पालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या आढावा बैठकीत पाणीपट्टी आणि पाणी चोरीचा आढावा घेत असताना त्यांनी अनधिकृत नळजोडण्या घेणार्यांवर कारवाई करताना त्यांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत करणार्या वॉल्वमेन ते कार्यकारी अभियंता यांच्यावरही कारवाई करण्याचे निर्देेश दिले. तसेच यापुढे अनधिकृत नळजोडणी दिसल्यास त्या प्रभागातील संबंधित पालिका कर्मचारी, अधिकार्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.