भाजपात इनकमिंग सुरूच; माजी नगरसेवकाचा प्रवेश

ठाण्यात ऑपरेशन कमळ सक्रिय

ठाणे: विधानसभा निवडणुकीत भाजपला ठाण्यात मिळालेले यश तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांची झालेली शकले या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीत स्वतंत्रपणे लढून पालिका काबीज करण्याचा मनसुबा भाजप नेते उघडपणे व्यक्त करू लागले आहेत. त्या दृष्टीने ऑपरेशन कमळ ही मोहीम अधिक सक्रिय झाल्याचे दिसत आहे. आज पुन्हा एकदा ठाण्यातील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाने भाजपात प्रवेश केल्याने ही बाब स्पष्ट झाली आहे.

घोडबंदर पट्टा मजबूत करण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक लॉरेन्स डिसोझा यांना भाजपने पक्षप्रवेश दिला आहे. शिवसेना पक्षाचे दोन गट झाल्यानंतरही लॉरेन्स डिसोझा यांनी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. माजिवाडा प्रभागातील पॅनलमध्ये ठाकरे गटाचे भवितव्य संपूष्टात आल्याने त्यांनी शिंदे गटात जाण्याऐवजी भविष्याचा वेध घेत भाजपत प्रवेश घेतला आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे माजिवाड्यात भाजपची ताकद वाढली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना ठाकरे गटातील नाराज माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश देण्याचा सपाटा सुरू केला आहे. ठाणे महापालिकेत २०१२ मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर माजिवडा गाव परिसरातून लॉरेन्स डिसोझा निवडून आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवलेल्या देवराम भोईर यांचा त्यांनी पराभव केला होता.

देवराम भोईर यांनी राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच पराभव या निमित्ताने पाहिला होता. त्यामुळे डिसोझा यांची ओळख जायंट किलर अशी झाली होती. पण जातपडताळणी तक्रारीमुळे ते पुढे अडचणीत आले. आता पुन्हा ते निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत.

माजिवाड्यात डिसोजा यांचा स्वतःचा मतदार आहे. त्यामुळे शिवसेनेत दोन गट झाल्यानंतरही त्यांनी शिंदे गटात जाण्याऐवजी ठाकरे गटासाठी काम करणे पसंद केले. पण या प्रभागात आता भाजपाचा मतदार वाढला असल्याने त्यांनी भाजपचा हात पकडला असल्याचे समजते. त्यांच्याबरोबर त्यांची कन्या स्टेफनी डिसोझा यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपविभागप्रमुख रामेश्वर बचाटे, आंबेडकरी चळवळीतील महेश चव्हाण यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपाचा झेंडा खांद्यावर घेतला. आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, शहर अध्यक्ष संजय वाघुले यांची प्रमुख उपस्थिती होती. तर माजी गटनेते नारायण पवार, मनोहर डुंबरे, माजी नगरसेविका स्नेहा आंब्रे, सरचिटणीस मनोहर सुगदरे, सचिन पाटील, महिला मोर्चा शहराध्यक्षा स्नेहा पाटील हे देखील उपस्थित होते.