पडघा परिसरात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान

पडघा: भिवंडी तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकरी हतबल झाला आहे. तालुक्यातील पडघा, खालिंग, वांद्रे , दळेपाडा, सौर, पाच्छापूर, उबरखांड, नेवाडा, खातीवली, दहागाव, सारमाल, डोहोळे, भोकरी, कोशिंबी आदी भागात मुसळधार पावसामुळे भातशेती आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

उरलेसुरले भात काढत असतानाच कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे परिपक्व अवस्थेतील भात पाण्यात भिजला आहे. काही ठिकाणी तर उभ्या पिकालाही कोंब फुटले असून, भाताच्या ओंब्या झडून गेल्या आहेत. परिणामी शेतकऱ्यांच्या मेहनतीचा घाम पाण्यात वाहून गेला आहे. भिवंडी तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी भातशेतीवर अवलंबून आहेत. मात्र अवकाळी पावसामुळे भात पिकाचे संपूर्ण नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा वर्षभराचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. मजुरी आणि बियाण्याचा खर्चही निघत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू तरळले आहेत.

महसूल आणि कृषी विभागाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ठाणे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा कृषी अधीक्षक यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.