दिवाळीत दाखल झालेल्या हापूस आंब्याची पेटी २५ हजाराला

नवी मुंबई: वाशीतील एपीएमसी फळ बाजारात यंदा दिवाळीच्या दिवशी देवगडमधील हापूस आंबा दाखल झाला होता. हा आंबा पिकल्यानंतर या सहा डझनच्या पेटीला विक्रमी असा २५ हजार रुपये दर मिळाला आहे. आजवरचा हा सर्वाधिक उच्चांकी दर ठरला आहे, अशी माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली.

दिवाळीच्या दिवशी देवगड तालुक्यातील पडवणे येथील आंबा बागायतदार प्रकाश शिर्सेकर यांची सहा डझन हापूस आंब्यांची पेटी मुंबई कृषी उत्पन्न बाजार येथील फळ मार्केटमध्ये दाखल झाली होती.
वाशी येथील नानाभाऊ जेजुरकर अँड कंपनी यांच्याकडे या आंबापेटीची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करण्यात आली होती.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आंबा पेटी दाखल होण्याची पहिलीच वेळ असल्याचे बाजार समितीतील व्यापारीवर्गाकडून सांगण्यात येत आहे. याआधीही, सुमारे पाच वर्षांपूर्वी नोव्हेंबर महिन्यात शिर्सेकर यांनी हापूस पेटी वाशी मार्केटला पाठवण्याचा मान मिळवला होता. मात्र, यावर्षी त्यांनी ऑक्टोबर महिन्यातच आंबा पेटी पाठवून दिवाळीचा मुहूर्त साधला होता, मात्र हा आंबा कच्चा असल्याने त्याची पूजा करून तो पिकण्यास ठेवला होता. हा आंबा पिकल्यानंतरच त्याची बोली लावली जाणार होती. त्यानुसार या आंब्याची बोली लागल्यानंतर या सहा डझन आंब्याच्या पेटीला विक्रमी दर मिळाल्याची माहिती व्यापारी हर्षल जेजुरकर यांनी दिली आहे.

एपीएमसी बाजारात आजवर दाखल होणाऱ्या कोकणातील मुहूर्ताच्या हापूस आंब्याला २० ते २२ हजार रुपयांचा दर मिळाला होता. यंदा मात्र देवगडमधील आंब्याला २५ हजारांचा दर मिळाला.