अश्विन शेळकेच्या शानदार सहा विकेट्सच्या जोरावर युनायटेड पटणी इंडस्ट्रीजने 48व्या ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेत बुधवारी सेंट्रल मैदानावर अभ्युदय बँकेवर आठ गडी राखून मात केली.
शेळकेने एका मागोमाग एक विकेट्स पटकावून अभ्युदय बँकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. या डावखुऱ्या फिरकीपटूने 3.1 षटकात एका मेडन सह सहा गडी बाद केले. त्याने त्याच्या स्पेलमध्ये फक्त सहा धावा दिल्या. अभ्युदय बँकेचा सलामीवीर राजेश विचारे (40 चेंडूत 28 धावा) हा त्याच्या संघासाठी एकमेव योद्धा होता कारण फक्त त्यानेच दुहेरी अंकात धावा केल्या. अभ्युदय बँकेचा संघ 16.1 षटकांत 63 धावांत गुंडाळला गेला.
प्रत्युत्तरात युनायटेड पटणी इंडस्ट्रीजने 10.2 षटकांत आठ गडी राखून लक्ष्य गाठले. धावांचा पाठलाग करताना दिशांत कोटियन (32 चेंडूत 28 धावा) आणि अक्षय लांजेकर (21 चेंडूत नाबाद 21) यांनी सर्वाधिक धावा केल्या. दोन विकेट घेणाऱ्या संजोग पाटील यांच्याशिवाय अभ्युदय बँकेच्या अन्य एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही.
संक्षिप्त धावफलक: अभ्युदय बँक 16.1 षटकांत सर्वबाद 63 (राजेश विचारे 28; अश्विन शेळके 6/6) पराभूत वि. युनायटेड पटणी इंडस्ट्रीज 10.2 षटकांत 2 गडी बाद 66 (दिशांत कोटियन 28; संजोग पाटील 2/22)