आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने होणार योग्य पुनर्वसन
ठाणे: अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पात उपवन परिसरातील लघु उद्योजक बाधित होणार असून या गाळेधारकांचे न्याय पुनर्वसन करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. आमदार संजय केळकर यांनी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात मेट्रो अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट सूचना केल्या.
भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित १०५व्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात उपवन परिसरातील अंतर्गत मेट्रो प्रकल्प बाधित गाळे धारकांनी उपस्थित राहून आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन कैफियत मांडली. या प्रकल्पामुळे सुमारे ३० गाळेधारक बाधित होणार आहेत. गेली ५०-६० वर्षे हे गाळेधारक येथे व्यवसाय करत असून प्रकल्पात बाधित झाल्याने त्यांच्या उपजीविकेवर गदा येणार आहे. या प्रकरणी श्री.केळकर यांनी संबंधित मेट्रो अधिकारी आणि गाळेधारकांची बैठक घेतली. या गाळे धारकांचे त्याच जागी किंवा जवळपास पुनर्वसन करण्याबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे गाळेधारकांना दिलासा मिळाला आहे. लवकरच संबंधित ठिकाणी संयुक्त पाहणी दौरा करण्यात येणार असल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले.
विकासकांकडून होत असलेल्या त्रासाचा पाढा देखील अनेक रहिवाशांनी श्री.केळकर यांच्यासमोर वाचला. मेरी गोल्ड सोसायटीच्या रहिवाशांनी पैसे भरून दहा वर्षे झाली तरी रहिवाशांना घरे मिळालेली नाहीत. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली असून फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. याबाबत संबंधित विकासक आणि रहिवाशांची बैठक घेण्यात आली. विकासकाने दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी विकासकांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार असल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले. पिनॅकल सोसायटीच्या रहिवाशांचा देखील असाच अनुभव या कार्यक्रमात निदर्शनास आला. विकासकाने कबूल केल्याप्रमाणे सोयी सुविधा मिळत नसल्याने रहिवासी आणि विकासकाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत दिलेल्या आश्वासनांबाबत विकासककाकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार असल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले. एका वृद्ध महिलेने घरासाठी विकासकाला सुमारे ९५ लाख रुपये दिले असून उर्वरित १५ लाख रुपये देण्यास महिला तयार असतानाही विकासक घर देण्यास टाळाटाळ करत आहे. याप्रकरणी संबंधित विकासकाला बोलावून प्रसंगी कायदेशीर मार्ग अवलंबून महिलेस न्याय देणार असल्याची माहिती श्री.केळकर यांनी दिली.
कार्यक्रमात नगरसेवक सीताराम राणे, विकास पाटील तसेच पदाधिकारी कैलास म्हात्रे आदी उपस्थित होते.
कॅन्सरग्रस्ताला महागडी औषधे
ठाण्यातील कॅन्सरग्रस्त रुग्ण रामा गवळी यांनी लागणारी औषधे महागडी असल्याने आमदार संजय केळकर यांच्याकडे व्यथा मांडली होती. श्री.केळकर यांच्या पुढाकाराने रोटरीचे संजय पवार यांनी औषधे उपलब्ध करून दिली. ही औषधे आजच्या उपक्रमात श्री.केळकर यांच्या हस्ते रुग्णास देण्यात आली.