* जिल्हा परिषदेत रणजित यादव यांची अचानक भेट
* दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांना नोटीसा बजावणार
ठाणे: जिल्हा परिषद प्रशासनातील कार्यालयीन शिस्त, जबाबदारी आणि कार्यक्षमता अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी ५ जून रोजी जिल्हा परिषद ठाणे मुख्यालयात आकस्मिक भेट देऊन विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची तपासणी केली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विविध विभागांतील हजेरी पत्रकांची पाहणी करून प्रत्यक्ष उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांची पडताळणी केली. कार्यालयीन वेळेत अनुपस्थित अथवा विनापरवानगी गैरहजर असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची स्वतंत्र नोंद घेण्यात आली असून संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पाहणीदरम्यान विविध विभागांतील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. नागरिकांकडून येणाऱ्या अर्ज, तक्रारी व प्रकरणांचा निपटारा वेळेत होणे, कार्यालयीन कामकाजात अनावश्यक विलंब टाळणे तसेच प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपल्या जबाबदाऱ्यांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद ही ग्रामीण भागातील नागरिकांना शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, महिला व बाल विकास, समाजकल्याण, कृषी तसेच विविध विकास योजनांच्या माध्यमातून थेट सेवा देणारी महत्त्वाची यंत्रणा आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती आणि तत्पर सेवा नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी सर्व विभाग प्रमुखांना आपल्या विभागातील उपस्थिती, कामकाजाची गुणवत्ता आणि प्रलंबित प्रकरणांचा नियमित आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच कार्यालयीन वेळेचे काटेकोर पालन करून नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश देण्यात आले.