अनधिकृत इमारतींची बत्ती गुल होणार!

शीळ, मुंब्रा आणि कळव्यात टोरंटचा शॉक

ठाणे: शीळ, मुंब्रा आणि कळवा परिसरातील अनधिकृत इमारतींना नवीन वीज जोडणी देण्यात येणार नसून, असलेल्या जोडण्याही खंडित करण्यात येणार असल्याचे टोरंट कंपनीने जाहीर केले आहे. यामुळे या परिसरातील अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांचे धाबे दणाणले आहेत.

न्यायालयीन आदेशांच्या अनुषंगाने, ठाणे महापालिका आयुक्तांनी टोरंट पॉवर आणि महावितरण यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. कोणत्याही अनधिकृत इमारतीला नवीन वीज जोडणी देण्यात येऊ नये. ज्या इमारतींना कायदेशीर मान्यता आहे, त्या इमारतींनाच नवीन वीज जोडणी देण्यात यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

या सूचनांनुसार टोरेंट पॉवर कंपनीने जे बांधकाम ठाणे महापालिकेने बेकायदेशीर घोषित केले आहे, त्यासाठी नवीन वीज जोडणीच्या अर्जांना नकार दिला जाईल. अशा इमारतींना आधीच वीज जोडणी मिळालेली असेल, तर ती सेवा खंडित केली जाऊ शकते.

टोरंट कंपनीच्या या कठोर भूमिकेमुळे शीळ, मुंब्रा आणि कळवा या भागात अनधिकृत इमारतींमध्ये दिलेल्या वीज जोडण्या खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याने सर्वसामान्य रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे तर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामधारकांचेही धाबे दणाणले आहेत.